Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 23 April, 2010

मोदींचा दावा फेटाळला, बैठक ठरल्यावेळीच

मुंबई, दि. २२ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २६ एप्रिलला बोलावलेली आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक बेकायदेशीर असल्याचा आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांनी केलेला दावा मंडळाने स्पष्टपणे फेटाळून लावला असून, बैठक ठरल्याप्रमाणेच होईल, अशी घोषणा केली आहे.
"मंडळाने बोलावलेली बैठक बेकायदेशीर आहे असे मोदी यांचे मत आहे. या बाबतीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे', असे नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंडळाचे सचिव एन. श्रीनिवासन हे आयपीएलचाच एक भाग असल्यामुळे त्यांना अशी बैठक बोलावण्याचा अधिकारच नाही, हा ललित मोदी यांचा दावाही मनोहर यांनी फेटाळून लावला आहे.
श्रीनिवासन आयपीएलचा भाग आहेत किंवा नाही याचा येथे काहीही संबंध नाही. हा मुद्दा जेव्हा चर्चेत आला त्यावेळी श्रीनिवासन यांनी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली होती. लिलावात सहभागी होण्यासाठी शरद पवार यांनी परवानगी दिल्यानंतरच श्रीनिवासन हे त्यात सहभागी झाले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी श्रीनिवासन यांनी नव्हे तर इंडिया सिमेंटने बोली लावली होती. लिलाव झाल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती, असे शशांक मनोहर यांनी पुढे सांगितले.
आयपीएलच्या संघात श्रीनिवासन एक भागीदार असल्याची मंडळाला माहिती होती. मात्र, ललित मोदी आणि त्यांच्या बऱ्याच नातेवाइकांनी आयपीएलच्या संघात गुंतवणूक केल्याबाबत मंडळाला काहीही माहीत नाही. श्रीनिवासन यांचा आयपीएलमधील सहभाग उघड आहे. परंतु मोदी यांनी आपल्या नातेवाइकांविषयीची माहिती गव्हर्निंग काऊन्सिलपुढे जाहीर करायला हवी होती. ही सर्व प्रक्रिया पार पडली त्यावेळी मी काऊन्सिलचा सदस्य नव्हतो, असेही मनोहर यांनी सांगितले.
२६ तारखेला होणाऱ्या बैठकीत आपली हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असल्याचे मोदी यांच्या लक्षात आल्यामुळे ते काही ना काही कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
----------------------------------------------------------------
आयपीएलमध्ये रुतलेय पवार, पटेल यांचे पाय
पंतप्रधानांनी मागितली माहिती

नवी दिल्ली, दि. २२ : माजी परराष्ट्रमंत्री शशी थरुर यांच्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आयपीएलचे बळी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आयपीएलमध्ये या दोन्ही नेत्यांच्या सहभागाबाबत माहिती मागितली आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांना प्रफुल्ल पटेल आणि त्यांची मुलगी पूर्णा यांच्या आयपीएलमधील कथित सहभागाबाबत माहिती दिली. तसेच शरद पवार यांच्याबाबतही माहिती दिली. त्यावर पंतप्रधान काय निर्णय घेतील? याकडे आत सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आयपीएलच्या लिलावात बोली काय असू शकेल याविषयीचा अंदाज व्यक्त करणारी एक फाईल आयपीएलचे सीईओ सुंदर रमण यांनी प्रफुल्ल पटेल यांची कन्या व आयपीएलची हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पूर्णा हिच्याकडे ईमेलद्वारे पाठवली. पूर्णाने ईमेल पटेल यांची सचिव चंपा भारद्वाजकडे तो फॉरवर्ड केला. नंतर चंपाने तो पटेल यांच्या आदेशानुसार परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शशी थरुर यांना पाठवून दिला. त्याचा अभ्यास करून थरुर यांनी कोचीसाठी आयपीएलची बोली जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी आयपीएलमध्ये आपला सहभाग असल्याचे वृत्त फेटाळले आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन लिलावात आपला काहीही संबंध नव्हता. आपल्या सहभागाविषयी येणारे वृत्त बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शशी थरुर आपले चांगले मित्र असून त्यांना आयपीएलसंदर्भात काही माहिती हवी होती म्हणून ललित मोदींशी बोलून ती मागवली होती. तीच थरुर यांना पाठवली. त्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते, असे पटेल यांनी म्हटले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी आयपीएलमध्ये शरद पवार यांचे जावई सदानंद सुळे यांच्याबाबत वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचीही माहिती पंतप्रधानांना दिली. सुळे यांचे दहा टक्के शेअर्स मल्टी स्क्रीन मीडिया या आयपीएलच्याच प्रसारण कंपनीमध्ये आहेत. ते वडिलांकडून त्यांच्याकडे आले आहेत. परंतु, सदानंद यांची पत्नी खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र, आयपीएलशी आपल्या कुटुंबाचा संबंध केवळ क्रिकेटप्रेमी म्हणून असल्याचे या आधीच स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पटेल यांच्या कुटुंबाशी आपला काहीही आर्थिक संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

No comments: