Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 April, 2010

जुगार पेडण्याची नव्हे, गांधी मार्केटची परंपरा!

क्रीडामंत्र्यांच्या जुगारप्रेमाचा पेडणेवासीयांकडून समाचार
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): पंचायत तथा क्रीडामंत्री बाबू आजगावकर हे मडगावच्या गांधी मार्केटचे नव्हे तर पेडणे तालुक्यातील धारगळ मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत याचे भान त्यांना कदाचित नसावे. जुगार ही पेडण्यातील जत्रोत्सवांची परंपरा कदापि नव्हती व नाही. जुगार ही कदाचित गांधी मार्केटची परंपरा असू शकते, पेडणेवासीयांच्या परंपरेबाबत बोलताना बाबू आजगावकर यांनी अशा पद्धतीने आपल्या अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन मांडू नये, असा सल्ला देत बाबूंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आज पेडणेवासीयांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला.
बाबू आजगावकर यांच्या या वक्तव्यामुळे आज संपूर्ण तालुक्यातीलच जनता ढवळून निघाली. जुगार समर्थकांकडून मात्र त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. बाबू आजगावकर यांनी आपणच खरे जुगारवाल्यांचे आश्रयदाते आहोत व पेडण्यातील जुगार हा त्यांच्याच मदतीने फोफावला आहे हे देखील या निमित्ताने उघड झाल्याचाही आरोप आता होतो आहे. "मांद्रे सिटीझन फोरम'ने या प्रकरणी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर करण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी क्रीडामंत्र्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांना योग्य समज देण्याचीही गरज असल्याचे फोरमने म्हटले आहे. फोरमच्या कार्याचे कौतुक करण्याचे सोडून जुगाराचे समर्थन करून बाबू आजगावकर यांनी जुगारविरोधी चळवळीची फजिती केली आहे. पेडण्यातील बेकार युवकांच्या प्रश्नावरून विधानसभेत आदळआपट करणारे पंचायतमंत्री तालुक्यातील युवकांना हीच शिकवण देणार आहेत काय, असा संतप्त सवाल तोरसे येथील माजी पंच विलास शेट्ये यांनी उपस्थित केला आहे.
मांद्रे सिटीझन फोरमने सुरू केलेल्या या लढ्याला आता तालुक्यातील सर्व समविचारी लोकांनी पाठिंबा देण्याची गरज आहे, असे सांगून हा लढा केवळ फोमपुरती मर्यादित न राहता पेडण्यातील तमाम युवकांनी व बुद्धिवादी लोकांनी मौन सोडून उघडपणे जुगार हद्दपार करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही श्री. शेट्ये म्हणाले. बाबू आजगावकर यांना पेडणेवासीयांनी जवळ केले याची परतफेड त्यांनी जुगार ही पेडण्याची परंपरा आहे, असे वक्तव्य करून करावी यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. धारगळ मतदारसंघात राष्ट्रीय क्रीडास्पर्धा होणार आहेत. तिथेही जुगाराचे पट भरवून ही पेडण्याची परंपरा आहे, असे सांगण्यासही ते कमी राहणार नाहीत, अशी खिल्लीही यावेळी अनेकांनी उडवली. फोरमचे अध्यक्ष सुदेश सावंत यांनी पेडणे पोलिसांकडून सुरू असलेल्या जुगार विरोधी मोहिमेचे जोरदार स्वागत केले. पेडणे पोलिस जुगार बंद करीत आहेत ही चांगली गोष्ट आहे; पण हा जुगार फोरमच्या तक्रारीवरून बंद करीत असल्याचे ते सांगत असल्याने फोरमच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य बनवण्याचे प्रकार सुरू झाल्याचेही श्री. सावंत म्हणाले. गैरकृत्यांबाबत माहिती देणाऱ्यांचे रक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी असते पण इथे पोलिस जागरूक नागरिकांनाच जुगारवाल्यांच्या हवाली करून नेमके काय साध्य करू पाहत आहेत, हेच कळत नसल्याचेही ते म्हणाले.
एका जबाबदार मंत्र्याकडून अशा पद्धतीने जाहीरपणे जुगाराचे समर्थन केले जाणे ही गोवा सरकारच्या दृष्टीने अत्यंत शरमेची व लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया फोरमचे प्रवक्ते ऍड. प्रसाद शहापूरकर यांनी व्यक्त केली. जुगार ही बेकायदा गोष्ट आहे व त्याला संपूर्ण गोव्यात कुठेच थारा मिळता कामा नये. बाबू आजगावकर हे सरकारात मंत्री आहेत व त्यामुळे जुगार बंद करणे ही त्यांचीही जबाबदारी ठरते. सत्तरी, डिचोली, बार्देश आदी ठिकाणी उघडपणे जुगार चालतो असे वक्तव्य करून बाबू आजगावकर यांनी त्या ठिकाणच्या पोलिस खात्याचे वाभाडेच काढले आहेत. जर ही गोष्ट खरी आहे तर गृहमंत्री रवी नाईक यांनी त्या ठिकाणच्या पोलिस निरीक्षकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही ऍड.शहापूरकर यांनी केली.

No comments: