Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 April, 2010

सत्तरीला पडलाय खाणींचा विळखा!

- गाव आणि गावराईवर येणार महासंकट
- संवेदनशील क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर
- येणाऱ्या काळात पाण्याची समस्या बिकट
- भूमिपुत्रांवर आभाळ कोसळण्याची शक्यता
- कृषिप्रधान सत्तरी धूळमातीत गाडली जाणार

वाळपई, दि. २२ (प्रतिनिधी): हिरवे डोंगर, वनराई, शेती, बागायती, कुळागरे यांनी कधी काळी सत्तरी तालुका नटला होता, असे म्हणण्याची पाळी आता सत्तरीवासीयांवर येऊ घातली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या तालुक्यात सध्या खाणींनी मांडलेला उच्छाद. सत्तरीतील पिसुर्ले, पर्ये, वेळगे, खडकी , गुडुमळ, आंबेली , खोतोडे, गवाणे, सोनाळ, सावर्डे, धावे, मासोर्डे, गुळेली अशा अनेक गावांत खाणींसाठी हालचाली सुरू आहेत. धावे हे एकमेव गाव वगळल्यास अन्य गावांत खनिजाचे उत्खनन सुरू आहे. धावे गावावर २००९ साली ऑगस्ट महिन्यात खाणीची जाहीर सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र तेथील लोकांचा रुद्रावतार पाहून ही सुनावणी रद्द झाली होती. दुर्दैवाची बाब म्हणजे सध्या धावे गावावरही खाणीचे संकट गडद होत चालले आहे.
वाळपईजवळच मासोर्डे गावात खाण उत्खननासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे वाळपई या मुख्य शहराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. सोनाळ, सावर्डे गावांतून तर गेल्या काही महिन्यांपासून चोरट्या मार्गाने बेकायदा माल नेण्यास सुरुवात झाली आहे. खुद्द वाळपई बाजारातून अत्यंत हुशारीने ट्रकांतून त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी माल नेला जात आहे. याची कल्पना वाळपईवासीयांना असूनही ते आरामात आहेत. गवाणे आंबेली येथील एका खाणीला सील ठोकण्यात आले होते. सील ठोकल्यानंतरही तेथील मशिनरी चोरीला जाते हा प्रकार संशयास्पद वाटतो. आंबेली गावाबरोबरच पिसुर्लेतही मोठ्या प्रमाणात खाण व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सत्तरीतील सर्वच गावे रानावनांनी बहरलेली. अशा खाणींमुळे ती नष्ट होत चालली आहेत. पूर्वी ही गावे हिरवीगार होती, आता त्यांचे रूपांतर लाल मातीत झाले आहे. लोकांच्या उपजीविकेचे साधन नष्ट करण्यात येत आहे. पैशांच्या लोभापायी काहींनी खाणींना पाठिंबा दिला; पण गरीब शेतकरी हवालदिल झाले आहेत. हिरवाईचा शालू नष्ट करून या तालुक्याला लाल मातीचा शालू नेसवण्याचा भयंकर कट रचला जात आहे. आपल्या फायद्यासाठी गरीब जनतेच्या जमिनी बळजबरीने घेऊन, अनेक सरकारी कायदे लादून अमानुषपणे खाणी सुरू केल्या जात आहेत. यात गरीब होरपळले जात आहेत. प्रभू रामचंद्रांच्या युगात रावणासारखे दुष्ट तयार झाले होते. या रावणाचा अखेर रामचंद्रांनी वध केला होता. द्वापर युगात यादवांनी जनतेचा छळ केला. या यादवांना श्रीकृष्णाने ठार मारले. आता कलियुगात मात्र खाणींच्या माध्यमातून अनेक "यादव' तयार होत आहेत. त्यांना थोपवणार कोण? भूमातेला या कलियुगातील यादवांनी पोखरून लक्ष्मीच्या हव्यासापोटी उत्खनन चालवले आहे. अशा खाणरुपी यादवांचा संहार करण्यासाठी ईश्वर अवतार घेईल का, असा प्रश्न सत्तरीवासीय विचारत आहेत. एरवी अनेक कार्यक्रमांत राजकीय नेते शेती टिकवणे गरजेचे आहे, युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे अशी साखरपेरणी करतात. मात्र हेच लोक मागील दरवाजाने खाणींसारखे प्रकल्प सुरू करून शेती नष्ट करू पाहत आहेत.
गोव्यात म्हणे ३० ते ३५ टक्के खाणी बेकायदा आहेत. कायदेशीर किंवा बेकायदा खाणी सुरू असल्या तरीही परिणाम बदलणार नाही. जमीन पोखरली जाणार आहे. सत्तरीतील गावेच येणाऱ्या काळात धुळीत गाडली जातील अशी भीती लोकांकडून व्यक्त होत आहे. पर्यावरणाचा विद्ध्वंस, सर्वसामान्यांना देशोधडीला लावणे व नैसर्गिक संपत्तीची निव्वळ लूट असेच त्याचे स्वरूप बनले आहे. एखाद्या गावात खाण सुरू होणार याची चाहूल लागताच अनेक विरोधक तयार होतात. शेवटी हेच विरोधक नोटा बघून फितूर होत खाणीला प्रोत्साहन देतात. अर्थात, एखाद्या गावात खाण सुरू होण्यास जनता तेवढीच जबाबदार आहे. खाणी सुरू झाल्या की, अपघाताचे प्रमाण वाढू लागते. धूळ प्रदूषण, रोगराई असे प्रकार वाढतात. याचे खाण मालकांना सोयरसुतक नसते. सर्वप्रथम समस्या भेडसावते ती पाण्याची. या खाणीमुळे नैसर्गिक पाणवठ्यांची पातळी खोल होत जाते. सत्तरीतील अनेक गावे उंचवट्यांवर आहेत. अशा खाणींमुळे हे उंचवटे एकदा सपाट झाले की मोठ्या प्रमाणात पुरासारखी स्थिती निर्माण होईल. सत्तरीत म्हादई नदी कर्नाटकातून येते. नंतर ती उर्वरित गोव्यात जाते. म्हणूनच या खाणींमुळे म्हादई नदी प्रदूषित होणार आहे. शिवाय सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनावर संक्रांत येणार आहे. मुख्य म्हणजे वाळपई शहराला होणाऱ्या दाबोस प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यावर याचा वाईट परिणाम होणार आहे. पिढ्यान्पिढ्या कसलेली कुळागरे नष्ट होणार असून जलस्रोतांचे अस्तित्वही धोक्यात येणार आहे. काही शेतकरी भूमिहीन आहेत. अनेकांकडे सरकारी जमिनी आहेत. काही जमिनी म्हादई अभयारण्य क्षेत्रात येतात. या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना जमिनी सरकार देत नाही. मात्र याच क्षेत्रात खनिज उत्खननासाठी परवानगी दिली जाते. हा उघड उघड पक्षपातच म्हटला पाहिजे. सध्या कमी दर्जाच्या खनिजावर चीनने बंदी आणली असे सांगितले जात असले तरी तो लोकांना फसवण्यासाठीचा राजकीय डाव नसेल कशावरून? या बंदीमुळे म्हणे खनिज व्यावसायिकांवर आभाळ कोसळले आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायचे? सरकारला त्यांच्याबद्दल दया येत नाही. चीनने घातलेल्या बंदीमुळे गोव्यातून कमी प्रतीचा माल निर्यात केला जायचा हेही सत्य उजेडात आले आहे. यंदा काजू पीक गोव्यात कमी झाले आहे. यावर्षी काजू बियांना ७० ते ८० रुपयापर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा होती. हा भाव आता ५५ रुपयांच्या आसपास घुटमळत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावे? खाणींमुळे सत्तरीतील गावात कमी पीक येऊ लागले आहे. हे खाण मालक गरीब जनतेचे संहारक बनले आहेत. त्यामागे त्यांचा स्वार्थच लपला आहे. हा प्रकार म्हणजे केसाने गळा कापण्याचाच प्रकार आहे. त्यामुळेच निसर्गसंपन्न सत्तरी तालुक्याला कोण वाचवणार, असा यक्षप्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर सत्तरीवासीयांनाच एकजूट होऊन शोधावे लागेल.

No comments: