Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 April, 2009

चलो, वायंगिणी किनारी

"गोवा बचाव अभियाना' ची अनोखी सहल

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी)- सामाजिक विषयांबाबत नेहमीच सतर्क असलेल्या "गोवा बचाव अभियान' संघटनेकडून प्रथमच एखाद्या विषयावर अनोख्या पद्धतीने जनतेचे लक्ष वेधण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. एरवी केवळ कोणत्या ना कोणत्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करणाऱ्या "गोवा बचाव अभियाना'तर्फे सर्व गोमंतकीयांना चक्क सहलीचे आमंत्रण देण्यात आले आहे. येत्या रविवार दि. १९ रोजी संध्याकाळी ५ वाजता ही सहल "सिदाद दी गोवा' हॉटेलच्या ताब्यात असलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वसामान्य जनतेसाठी खुल्या झालेल्या वायंगिणी किनाऱ्यावर आयोजित करण्यात आली आहे.
दोनापावला येथे सार्वजनिक वापरासाठी निश्चित केलेल्या जागेवर हॉटेल "सिदाद दी गोवा'कडून बांधकाम करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकारला करावयाची होती, परंतु राज्य सरकारने मात्र भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करणारा वटहुकूम जारी करून या हॉटेलच्या तथाकथित बांधकामाला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या विषयावरून "गोवा बचाव अभियान' संघटनेतर्फे सरकारचा जाहीर निषेधही करण्यात आला होता. हा वटहुकूम विधानसभेत सरकारने बहुमताच्या जोरावर मान्य करून घेतल्याने तो काळा दिवस म्हणून पाळण्यात आला होता. खुद्द सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून सरकारकडून धनिकांचे हित जपले जाते, असा आरोप करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मात्र सरकारकडून अजिबात तत्परता दाखवली जात नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालात २० एप्रिलपर्यंत सदर बांधकाम पाडण्याचे आदेश सरकारला दिले होते. आता सरकारने वटहुकूम जारी करून ही कारवाई टाळली असली तरी या आदेशाची अंतिम मुदत संपण्यापूर्वी हा सहलीचा कार्यक्रम येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या हॉटेलकडून आपली खाजगी मालमत्ता असल्यागत वापरला जाणारा वायंगिणी किनारा जनतेसाठी खुला झाल्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा, हा या सहलीमागचा उद्देश असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान, या सहलीनिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर केले जाणार आहे. यात "सॅटर्डे इव्हनींग क्विझ क्लब'तर्फे प्रश्नमंजूषा स्पर्धा, आंतोनियो कॉस्ता यांच्यातर्फे चित्रकला कार्यशाळा, "द मस्टर्ड सीड कंपनी'तर्फे नाट्य कार्यशाळा तसेच संगीत, विविध मनोरंजनपर खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार सुबोध केरकर यांच्यातर्फे या किनाऱ्यावर खास कलाकृतींचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.
ही सहल नेहमीची नसून जनतेची थट्टा चालवलेल्या सरकारच्या पक्षपाती व भ्रष्ट कारभाराचा एका अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचाच प्रकार असेल. जनतेने सुरू केलेल्या एखाद्या लढ्याला न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ही सहल आहे. या सहलीवेळी भाषणबाजी किंवा तत्सम प्रकार अजिबात असणार नाहीत. या सहलीला लोकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे व एरवी आपल्यासोबत सहलीला न्यायचे सामान व खाण्यापिण्याचे प्रकारही सोबत घ्यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. उपस्थितांना सहलीचा आनंद मोकळेपणाने घेता येईल, अशी माहिती अभियानाच्या सचिव रिबोनी शहा यांनी दिली आहे.

No comments: