Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 12 April, 2009

दक्षिण गोव्यात कॉंग्रेस 'गॅस'वर, समेटासाठी हरिप्रसाद गोव्यात

पणजी, दि. ११(प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद व नेत्यांकडून परस्परांवर सुरू असलेल्या जाहीर टीकेचा गंभीर परिणाम पक्षाचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांच्या प्रचारावर होत आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढणे आणि नेत्यांत समेट घडवून आणण्यासाठी पक्षाचे केंद्रीय प्रभारी बी. के. हरिप्रसाद आज संध्याकाळी गोव्यात दाखल झाले. दक्षिणेत सध्या कॉंग्रेसमोर मोठी अडचण बनलेले सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्याशी रात्री उशिरापर्यंत त्यांनी चर्चा केल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वादामुळे उत्तरेतील उमेदवारी जाहीर होण्यास झालेला विलंब व त्यात उत्तरेची जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्याने कॉंग्रेस गोटात पसरलेली नाराजी यामुळे ही जागा गमावल्यातच जमा आहे. आता दक्षिणेतील बालेकिल्ला सांभाळण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने पक्षातील वातावरण पूर्णपणे बिघडले आहे. दक्षिणेत सुरुवातीस उमेदवारीवरून पक्षांतर्गत सुरू असलेले शीतयुद्ध अजूनही शमले नसून निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असतानाही पक्षातील सुंदोपसुंदी अजूनही चालूच आहे. आपली कन्या वालंका हिला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या चर्चिलची पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर आता निवडणूक आयोगाने सेव्ह गोवा फ्रंट पक्षाचे विलीनीकरण अवैध ठरवण्याचा निवाडा दिल्याने पुन्हा एकदा चर्चिल यांनी कॉंग्रेसला वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. केवळ सत्ता टिकवण्यासाठी कॉंग्रेसने आपला पाठिंबा मिळवला व विलीनीकरण करताना योग्य प्रक्रियेचा अवलंब न करता विश्वासघात केला,अशी दृढ समजूत चर्चिल समर्थकांची बनली आहे. सभापती प्रतापसिंग राणे यांनी अपात्रता प्रकरणी येत्या १६ रोजी सुनावणी ठेवल्याने चर्चिल समर्थकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, चर्चिल यांनी पक्षावर दबाव आणण्यासाठी आपला व सहकारी आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचे नाट्य बरेच रंगवल्याने पक्षातील नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. हरिप्रसाद यांनी आज त्यांच्याशी दीर्घ चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. मिकी पाशेको यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर कोणतीही कारवाई होणार नाही, याची हमी दिल्यास आपण राजीनामा घेण्याचा विचार मागे घेऊ अशी अट त्यांनी श्रेष्ठींसमोर घातल्याचीही चर्चा पक्षांतर्गत सुरू होती. हरिप्रसाद यांनी सभापती राणे यांच्याशी चर्चा करून या अपात्रता याचिकेवरील संभावित कारवाई टाळावी तरच आपण गप्प बसू; आपल्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा डाव असेल तर राजीनामा देणे भाग असल्याचे त्यांनी सुनावल्याने हे प्रकरण कॉंग्रेससाठी नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments: