Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 13 April, 2009

चर्चिल ही कॉंग्रेससाठी डोकेदुखी

हरिप्रसाद यांची कबुली

भेट निष्फळ ठरल्याचे उघड

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) : चर्चिल आलेमांव हे जरी एक अनुभवी व ज्येष्ठ नेते असले तरी सद्यःस्थितीत ते कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरलेले आहेत, अशी कबुली अ. भा. कॉंग्रेसचे सरचिटणीस हरिप्रसाद यांनी आज येथे दिली. चर्चिलसंबंधी काहीही वाद नसल्याचे भासवणाऱ्या हरिप्रसाद यांच्यावर झालेल्या प्रश्नांच्या भडिमारानंतर ही कबुली देत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. चर्चिल यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आलेले हरिप्रसाद यांची ही भेट निष्फळ ठरल्याचेही यानिमित्ताने उघड झाले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चिल यांच्या पवित्र्यामुळे पक्षासमोर जी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे ती दूर करण्याच्या मोहिमेवर आलेल्या हरिप्रसाद यांना आज येथील "नानू टेल'मध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्र्नांच्या सरबत्तीला तोंड देताना त्रेधातिरपीट उडाली.
कन्या वालंकाला न मिळालेले तिकीट व त्यातच अपात्रता याचिकेचे संकट यामुळे खवळलेल्या चर्चिल यांनी पक्षनेतृत्वासमोर ठेवलेल्या अटींबाबत काय झाले असे विचारले असता हरिप्रसाद यांनी जणू काहीच झालेले नाही, वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तात काहीच तथ्य नाही अशी जेव्हा भूमिका घेतली तेव्हा त्यांच्यावर उलटसुलट प्रश्र्नांचा भडिमार केला गेला व त्यात ते पुरते गोंधळले. त्यावेळी त्यांनी चर्चिल ही पक्षासाठी डोकेदुखी ठरल्याचे मान्य केले.
त्यांनी सेव्ह गोवा फ्रंट कॉंग्रेसमध्ये विलीन करताना कोणतीही अट घातली नव्हती मात्र त्याच्या काही समस्या होत्या, त्या सोडवून त्या पक्षाचे विलीनीकरण करण्यात आले. वालंकाला तिकीट देण्याचा प्रश्र्न तर विचारासाठी देखील पुढे आला नव्हता. कॉंग्रेस हा वचनाचा पक्का आहे व त्यांना जर तसे वचन दिले गेले असते तर त्याचे खात्रीने पालन झाले असते असे सांगून एकप्रकारे चर्चिलच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे अप्रत्यक्षपणे सुचविले.
वालंकाचा पत्ता कापण्यात मुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षांचा हात असल्याचा जो जाहीर आरोप चर्चिल यांनी केला आहे त्याबाबत विचारता त्या उभयतांचे काम फक्त शिफारस करण्याचे असते, उमेदवाराची निवड ही सरतेशेवटी श्रेष्ठी पर्यायाने सोनिया गांधी करतात व ती करताना विविध निकष लावले जातात त्यात सर्वांत महत्त्वाचा म्हणजे निवडून येण्याची क्षमता अजमावली जाते असे त्यांनी सांगितले.
चर्चिल यांनी सभापतींसमोर असलेल्या अपात्रता याचिकेबाबत घातलेल्या अटीबाबत विचारता तो प्रश्र्न सभापतींच्या अखत्यारीत असल्याचे सांगून त्यावर काहीही बोलण्याचे त्यांनी टाळले. मात्र काही ज्येष्ठ कॉंग्रेस नेतेच मिकी पाशेकोमार्फत हे अपात्रता प्रकरण खदखदत ठेवत आहेत असा जो आरोप चर्चिल यांनी केला आहे त्याबाबत आपणाला काहीच माहीत नाही असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले मात्र राष्ट्रवादी हा मित्रपक्ष आहे व उभय पक्षांची समन्वय समिती एकत्र बसून ही समस्या सोडविल, असे त्यांनी सांगितले.
चर्चिल समर्थकांनी पंधरा दिवसांपूर्वी मडगावात घेतलेल्या जाहीर सभेत हायकमांडचा राजकीय सल्लागार म्हणून उपस्थित असलेल्या कोणा एन. के. शर्मा यांच्याबाबत विचारलेले प्रश्र्न हरिप्रसाद यांना अस्वस्थ करून गेले, हा शर्मा कोण, त्याचा कॉंग्रेसशी संबंध काय या प्रश्र्नावर त्यांनी सदर शर्माचा कॉंग्रेसशी काहीच संबंध नाही असे सांगितले मात्र तसे असेल तर राज्यातील एका मंत्र्यांने घेतलेल्या सभेत त्याची तशी ओळख कशी करून दिली गेली तसेच पक्ष प्रवक्त्याने त्याच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन कसे काय केले, या प्रश्र्नावर त्यांनी मौन स्वीकारले व पत्रकार परिषद आटोपती घेतली.

No comments: