Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 16 April, 2009

मुंबई हल्ला प्रकरण: ऍड. अंजली वाघमारे यांची नियुक्ती रद्द, कसाबकडून पाकी वकिलाची मागणी

मुंबई, दि. १५ : मुंबई हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अजमल आमीर कसाब याच्या बाजूने खटला लढण्यासाठी तयारी दर्शवणाऱ्या ऍड. अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द झाली असून पुन्हा कसाबसाठी वकील नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. उद्या, गुरुवारी नव्या वकिलाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
ऍड. अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती होण्यापूर्वीच त्यांनी मुंबई हल्ल्यातील एका पीडिताचे वकीलपत्र घेतले होते. कसाबच्या वकील म्हणून वकीलपत्र स्वीकारण्यापूर्वी त्यांनी न्यायालयाला याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. पण, त्यांनी असे केले नाही. त्यांनी ही बाब न्यायालयापासून लपवून ठेवली. त्यामुळे व्यवसायिक मूल्यांशी प्रतारणा केल्याप्रकरणी ऍड. वाघमारे यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ऍड. के. लाम यांनी विशेष न्यायालयात दाखल केली होती.
त्यावर सुनावणी करताना आज विशेष न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी यांनी ऍड. वाघमारे यांच्यावर ताशेरे ओढत कसाबच्या वकील म्हणून त्यांची नियुक्ती रद्द केली. ऍड. वाघमारे यांनी न्यायालयाला उपरोक्त बाबीची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. कसाबच्या वकील म्हणून तुमची नियुक्ती रद्द झाली असली तरी न्यायालयातील तुमच्या उपस्थितीवर कोणतेही प्रतिबंध नाहीत, असा शेराही न्यायाधीशांनी मारला. आता कसाबसाठी पुन्हा नव्या वकिलाचा शोध सुरू झाला आहे.
पाकिस्तानी वकील हवा : कसाब
दरम्यान, ऍड. वाघमारे यांची नियुक्ती रद्द झाल्यानंतर कसाबने आपल्यासाठी पाकिस्तानी वकिलाची मागणी केली. न्यायाधीशांनी त्याची ही मागणी फेटाळून लावली. भारतीय कायद्यानुसार हे शक्य नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यावर कसाबने पुन्हा पाकिस्तानी सरकारला पत्र लिहून वकील देण्याची विनंती करण्याची परवानगी मागितली. न्यायाधीशांनी त्याला ही परवानगी बहाल करतानाच पाकिस्तानी वकील भारतीय वकिलांचे सहाय्यक म्हणून काम पाहू शकतात, असेही सांगितले. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
आज प्रथमच कसाबला विशेष न्यायालयात सादर करण्यात येणार होते. त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रचंड सुरक्षा ठेवण्यात आली होती. सुरक्षेच्या बंदोबस्तातच आज कसाबला न्यायालयात सादर करण्यात आले.

No comments: