Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 August, 2010

आजपासून भाजपतर्फे जाहीर निषेध सभा

सरकारचा गलथान कारभार उघड करणार
पणजी, दि.२० (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार सर्वच पातळीवर पूर्णतः अपयशी ठरले आहे, याचा पर्दाफाशच विरोधी भाजपने पावसाळी अधिवेशनात केला आहे. या अधिवेशनात सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांना हरताळ फासण्याचाच प्रकार सुरू असून ही असमर्थता आता थेट जनतेच्या दरबारात नेण्याचा संकल्प भाजपने केला आहे. उद्या २१ पासून सर्व तालुक्यात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असून सरकारच्या भ्रष्टाचाराचे पाढेच जनतेसमोर वाचून दाखवले जातील,अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली.
आज इथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. वाढती महागाई,आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, सरकारी नोकऱ्यांचा बाजार,बेकायदा खाण व्यवसायाचा उद्रेक व विविध खात्यांतील सुरू असलेला सावळागोंधळ या सभांच्या निमित्ताने जनतेसमोर नेला जाणार असल्याचे यावेळी प्रा.पार्सेकर म्हणाले.उद्या २१ रोजी पहिली जाहीर सभा वास्को येथील टुरिस्ट सभागृहात संध्याकाळी ५ वाजता होईल. या सभेसाठी "काश्मीर बचाव' चा नारा देण्यात येणार आहे. या सभेसाठी गोवा प्रदेश भाजपच्या नवनियुक्त प्रभारी आरती मेहरा हजर राहणार आहेत. या सर्व सभा संध्याकाळी ५ वाजता होणार असून आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमांनुसार २२ - कुडचडे, २५ - पेडणे - कोरगाव, २६ वेळगे- साखळी, २७- काणकोण,२८- माशेल,२९-डिचोली,३१- शिरोडा,१- मेरशी,४ फातोर्डा व ५ केपे अशा सभा होणार आहेत.
साखळी पुराला सरकारच जबाबदार
साखळीत ओढवलेल्या पूर परिस्थितीला सरकारच्या व्यवस्थापनातील भोंगळपणाच जबाबदार आहे,अशी टीका आज प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली.अंजुणे धरणाचे पाणी सोडताना त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.अंजुणे धरणाचे पाणी साखळीत आले असता तिथे पंप सुरू करण्यासाठी कर्मचारीच गैरहजर राहणे, हा सरकारच्या बेफिकीर कारभाराचा भाग आहे. साखळीत पुरप्रतिबंधक कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याने सरकार याप्रकरणी उघडे पडल्याचा ठपकाही यावेळी प्रा.पार्सेकर यांनी ठेवला.

No comments: