Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 19 August, 2010

हिंमत असेल तर वालंकाविरुद्ध निवडणूक लढवून दाखवाच

संतप्त चर्चिल यांचे मिकींना आव्हान
मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी): हिंमत असेल तर आमदार मिकी पाशेको यांनी वालंकाविरुद्ध बाणावलीतून निवडणूक लढवून दाखवावी, असे प्रतिआव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिले आहे. आज "नानूटे'ल येथे तातडीने घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.
काल मिकी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील कारभाराच्या सीबीआय चौकशीची मागणी करताना विविध आरोपांची सरबत्तीच केली होती. आरोपांची ती जंत्री आज चर्चिल यांनी फेटाळून लावली. पत्रपरिषदेत चर्चिल यांनी बांधकाम खात्यातील अभियंत्यांनाही पाचारण करून बाणावलीतील रस्ते बांधकामाबाबत मिकी यांनी केलेले आरोप कसे बिनबुडाचे आहेत ते कागदपत्रांसह दाखवून दिले. मिकी हे अशिक्षित असल्यामुळे त्यांना कागदपत्रांतील काहीच कळणार नाही, अशी संभावनाही त्यांनी केली.
बांधकाम खात्याने चार महिन्यांपूर्वी केलेला रस्ता या पावसाळ्यात वाहून गेल्याचा जो दावा मिकी यांनी केला आहे त्याचा उल्लेख करत चर्चिल म्हणाले, खात्याने हा रस्ता चार महिन्यांपूर्वी नव्हे तर सात वर्षांपूर्वी बांधला होता. नंतर त्यावर पुन्हा डांबराचा थरदेखील घातला गेलेला नाही. गेल्या उन्हाळ्यात त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम तेवढे खात्याने केले आहे. सदर रस्त्यावरील खड्यांत कवाथे लावण्याचा प्रकार हा बालिशपणा आहे. यात सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला भाग आक्षेपार्ह असून त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
मिकी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बाणावलीच्या विकासासाठी काहीही केले नाही याचा चर्चिल यांनी पुनरुच्चार करतानाच कल्वर्ट गोन्साल्विस यांनी पुढे आणलेले प्रस्ताव बाजूला सारले असे सांगितले. नेली रॉड्रिगीस यांनी ग्रामीण विकास यंत्रणेतील भानगडींबाबत केलेल्या आरोपांसंदर्भात ते म्हणाले की, नेलीच तो व्यवहार पाहत होत्या. आता त्यांना त्या पदावर काढून टाकल्यावर कंठ फुटला आहे. या भानगडीची त्यांनाच चांगली माहिती असावी, असे दिसते.
पर्यटन खात्यावर मिकींनी "वर्चस्व' निर्माण केले होते. आता मंत्रिपद गेल्याने ते अधिक वैफल्यग्रस्त होऊन तोंडाला येईल तसे बोलू लागले आहेत, असे चर्चिल म्हणाले. एवढेच नव्हे तर चर्चिल यांनी शिवराळ भाषेत मिकी यांच्या वैयक्तिक जीवनाचीही चिरफाड केली.
आपणावर कोणी कसलेही आरोप केले नाहीत; त्यामुळे आता आपली कसली चौकशी करणार, असा सवाल त्यांनी केला.

No comments: