Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 August, 2010

पणजी पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांत 'टोळीयुद्ध'

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): आल्तिनो येथील सरकारी पॉलिटेक्निकमध्ये आज सायंकाळी विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली. विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत मुलांनी पैशांचा वापर तसेच बाहेरून आणलेल्या "बाऊन्सर'चाही वापर करण्यात आल्याचा आरोप महाविद्यालयाचे प्राचार्य लुईस फर्नांडिस यांनी केला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या दंगामस्तीची तक्रार पणजी पोलिस स्थानकात नोंद झाली नव्हती.
अधिक माहितीनुसार आज सकाळी ३३ वर्गप्रतिनिधींची निवडणूक झाली होती. यात काही विषयांत नापास झालेले विद्यार्थी तसेच महाविद्यालयात दंगामस्ती करणारे तीन विद्यार्थी पैशांच्या बळावर जिंकून आल्यावर त्या तीनही वर्गाची पुन्हा निवडणूक घेतली जाणार असल्याचा निर्णय महाविद्यालयातर्फे घेण्यात आला. त्यामुळे सायंकाळी सरचिटणीस (जीएस) पदाची होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालयात कारवाई झाली आहे अशा विद्यार्थ्यांना निवडणूक लढविता येत नाही, असा नियम असल्याने, याची दखल घेऊन ही निवणूक पुढे ढकण्यात आल्याचे प्रा. फर्नांडिस यांनी सांगितले.
तीन वर्ग प्रतिनिधींची निवड रद्द ठरवल्याने आणि सरचिटणीसपदाची निवडणूक पुढे ढकल्याने प्रा. फर्नांडिस यांनी दोन्ही गटांना आपल्या केबिनमध्ये घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांचे दोन्ही गट समाधानी दिसले पण आपल्या केबिनमधून बाहेर गेल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या एका गटाने आणलेल्या "बाउंसर'नी दंगामस्ती करण्यास सुरुवात केली, असे प्रा. फर्नांडीस यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस त्या बाउन्सरनी अडवली. तसेच एका विद्यार्थ्याला बस मधून बाहेर काढून मारहाण करण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. या निवडणुकीत पैसा आणि बळ वापरण्यात आल्याने सायंकाळी होणारी सरचिटणीसपदाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. ही निवडणूक येत्या आठवड्यात घेतली जाणार असल्याचे प्राचार्य फर्नांडिस यांनी सांगितले.

No comments: