Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 20 August, 2010

"गोमेकॉ'च्या नऊ विद्यार्थांना अटक

रॅगिंगप्रकरणी कडक कारवाईचा बडगा
-हॉस्टेलमधून निलंबित


पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या सात मुलांचे रॅगिंग केल्याप्रकरणी अंतिम वर्षाच्या ९ विद्यार्थ्यांना आज महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून निलंबित करण्यात आले. तर, महाविद्यालयाच्या रॅगिंगविरोधी समितीने दिलेल्या पोलिस तक्रारीवरून रात्री उशिरा या नऊ विद्यार्थ्यांना अटक करून वैयक्तिक जामिनावर सोडून देण्यात आले. या प्रकरणात मनीष उज्ज्वल, वैभव सायक्या, अंकित जैन, मयूर गुप्ता, ललितकुमार दास, भानू मिश्रा, विवेक कासिर, प्रविणसेन जैन व प्रोसेनजीत हलदार या विद्यार्थ्यांना अटक झाली आहे. दरम्यान, रॅगिंगला बळी पडलेल्या त्या सातही विद्यार्थ्यांनी जबानी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे.
रॅगिंगविरोधी समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत हे नऊ विद्यार्थी दोषी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध भा.दं.सं. १४३, ३४१, ३५२, ५०४ व १४९ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी दिली. रॅगिंग प्रकरणी गोव्यात विद्यार्थ्यांना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. न्यायालयात या विद्यार्थ्यांवर गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना वैद्यकीय शिक्षणावर पाणी सोडावे लागणार आहे. काल रात्री वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये पहिल्या वर्षाच्या सात विद्यार्थ्यांचे रॅगिंग सुरू असल्याचे उघडकीस आले होते. यावेळी हॉस्टेलचे वॉर्डन डॉ. सी पी. दास यांनी वरिष्ठ विद्यार्थी रॅगिंग करीत असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्याने आज सकाळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र हे रॅगिंग प्रकरण दि. १० ऑगस्टपासून सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार काल रात्री ९ ते १ पर्यंत हा रॅगिंग प्रकार सुरू होता. "एमबीबीएस' अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रात्रीचे जेवण झाल्यानंतर खाली बोलावण्यात आले. यावेळी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्या सातही विद्यार्थ्यांना गुडघ्यावर उभे करून प्रत्येकाला सलाम ठोकण्याचे आदेश दिले. त्यावरून प्रत्येक विद्यार्थी आपले नाव, गाव, वय असा परिचय देऊन गुडघ्यावरच थांबून वरिष्ठ विद्यार्थ्यांना सलाम ठोकत होते. यावेळी सुरू असलेला गोंधळ ऐकून रात्री १ वाजता हॉस्टेलचे वॉर्डन आल्याने त्यांनी प्रत्यक्ष हा प्रकार पाहिला. तसेच, रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याची नावे नोंद करून घेतली.
आज सकाळी या प्रकाराची माहिती महाविद्यालयाचे डीन डॉ. जिंदाल यांना दिला असता, त्वरित रॅगिंगविरोधी समितीची बैठक बोलावण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत त्या नऊही विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचे सिद्ध होताच त्याची आगशी पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली. महाविद्यालयाच्या सर्व भिंतीवर तसेच हॉस्टेलमध्ये रॅगिंगविरोधी पोस्टर व रॅगिंग करताना आढळल्यास पोलिस कारवाई होऊ शकते, अशी माहिती दिलेली असतानाही रॅगिंगचा प्रकार झाल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याविषयीचा अधिक तपास आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे करीत आहे.

दहा दिवसांनी जाग आली!
दि. १० ऑगस्टपासून सुरू असलेल्या रॅगिंगचा प्रकार रॅगिंगविरोधी समितीला एवढ्या उशिरा कसा लक्षात आला, याबद्दल आज महाविद्यालयात जोरदार चर्चा सुरू होती. हॉस्टेलमध्ये रॅगिंग होऊ नये, म्हणून त्याठिकाणी गस्तीसाठी दोन डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. हे डॉक्टर कुठे होते, तसेच विद्यार्थ्यांचे ९ वाजता सुरू झालेले रॅगिंग वॉर्डनच्या ११ वाजता कसे लक्षात आले, रात्री ११ पर्यंत हॉस्टेलचे वॉर्डन कुठे होते, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेले सर्व विद्यार्थी दि. ५ ऑगस्ट रोजी सर्व हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवसापासूनच रॅगिंग होत असल्याने दिल्ली येथील एका मुलाने आपल्या वडिलांना दिल्लीतून बोलावून घेऊन हॉस्टेल सोडले होते, अशी माहिती मिळाली आहे. रॅगिंगच्या नावाने रात्री २ पर्यंत काही विद्यार्थ्यांना गुडघ्यांवर उभे ठेवले जात होते, असेही सूत्रांनी सांगितले.

No comments: