Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 15 August, 2010

ख्यातनाम उद्योगपती बी.जी. शिर्के निवर्तले

पुणे, दि. १४ : पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलाचे शिल्पकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ उद्योगपती बी. जी. शिर्के यांचे आज (शनिवारी) पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
शिर्के उद्योग समुहाचे संस्थापक बाबुराव गोविंदराव शिर्के यांनी अनेक अवाढव्य प्रकल्प उभारले. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी शिर्के समुहाला एक आंतरराष्ट्रीय किर्तीचा उद्योगसमुह म्हणून विकसित केले. पुण्याच्या बालेवाडी क्रीडासंकुलाचे शिल्पकार, दुबईतील अनेक मशिदी आणि वसाहतींचे निर्माते, नवी मुंबई प्रकल्पातील एक प्रमुख विकासक म्हणून शिर्के यांची ओळख होती.
एका शेतकरी कुटुंबात १ ऑगस्ट १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची परंपरा नसलेल्या घरात जन्मलेल्या शिर्के यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. ज्ञान संपादनाचा ध्यास घेतलेल्या शिर्के यांनी कमवा आणि शिका या तत्वाचे पालन करत आपले शिक्षण पूर्ण केले. ते १९४३ मध्ये सोओइपीमधून ते सिव्हिल इंजिनिअर झाले. वाई-पसरणी परिसरातील पहिला सिव्हील इंजिनिअर होण्याचा मान पटकावणा-या शिर्के यांनी शिक्षण पूर्ण होताच एक वर्षाच्या आत उद्योग क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी १९४४ मध्ये स्थापन केलेल्या सुप्रीम कस्ट्रक्शन कंपनीने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती केली.
किर्लोस्कर समुहाच्या अनेक प्रकल्पात सहभागी झालेल्या शिर्के यांनी मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला संकुलातील स्पोर्टस कॉम्प्लेक्स, हिंजवडी आयटी पार्क, चेन्नईतील विप्रो आयटी पार्क यासह देशाविदेशात अनेक मोठ्या प्रकल्पांचे बांधकाम केले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये अनेक सरकारी प्रकल्प शिर्के उद्योग समुहाने बांधले. सामाजिक जाणिवेतून शिर्के यांनी कंपनीच्या उत्पन्नातूनच गरिबांसाठी दर्जेदार घरे बांधली आहेत.

No comments: