Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 August, 2010

'गोमेकॉ'त आणखी रॅगिंगचे प्रकार

अनुसूचित जाती, जमातीच्या दोन विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्गाच्या अनुसूचित जाती व जमातीतील दोन विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक वैद्यकीय शिक्षण सोडल्याने यामागे रॅगिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. याविषयीची एक तक्रार दाखल झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयात उच्चभ्रू विद्यार्थी जातिवाचक शब्द वापरून गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांचे रॅगिंग करीत होते, असेही या तक्रारीत म्हटले असून या तक्रारीची प्रत गोव्याचे राज्यपाल डॉ. एस एस. सिद्धू, सर्व मंत्री तसेच जनजाती आयोगालाही तक्रार पाठवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रकार जोरात सुरू असून काल उघडकीस आलेला प्रकार हे हिमनगाचे टोक असल्याची चर्चा आज सुरू होती. रॅगिंग प्रकरणात नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई होताच आता रॅगिंगची आणखी प्रकरणे उघडकीस यायला लागली आहेत.
दरम्यान, काल सात विद्यार्थ्यांनी रॅगिंगची दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्या नऊ विद्यार्थ्यांवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. आज दिवसभर त्यांनी त्या विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनीष उज्ज्वल या विद्यार्थ्यांच्या बळावरच हे रॅगिंग चालत होते. तसेच हा विद्यार्थी गोव्यातील काही विद्यार्थ्यांनाही हाताशी धरून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे रॅगिंग करीत होता, अशी माहिती आज उघडकीस आली आहे. या रॅगिंगला कंटाळून पूर्वांचलातील एका विद्यार्थ्याला हॉस्टेल सोडणे भाग पडले होते. राष्ट्रीय कोट्यातून त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याचा एक भाऊही गोव्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो घरापासून ५ हजार ५०० किलोमीटर लांब गोव्यात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आला आहे.
या घटनेनंतर आता स्थानिक विद्यार्थ्यांनीही रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी द्यायला सुरुवात केली आहे. यात एका गोव्यातील उच्चभ्रू विद्यार्थ्यांच्या विरोधात एक तक्रार दाखल झाली असून त्याने मनीष उज्ज्वल याच्या मदतीने जातिवाचक शब्द वापरून आई, वडील तसेच प्रेयसीवरून अश्लील शिव्या देऊन रॅगिंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, संपूर्ण कपडे काढून वर्गासमोर उभे केले जाणार असल्याचीही धमकी त्याला दिली जात होती."आम्ही उच्चवर्णीय आहोत' असे म्हणूनही हॉस्टेलमध्ये छळ केला जात होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी दोन विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सोडले आहे. त्या दोघा विद्यार्थ्यांनंतर आता तो उच्चभ्रू विद्यार्थी व मनीष आता मला सतावत आहेत, असेही या विद्यार्थ्याने राज्यपालांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या दोघांबरोबर आणखी एका विद्यार्थ्याचा समावेश असून त्याचे आपल्याला नाव माहित नसल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.

No comments: