Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 18 August, 2010

भ्रष्ट बांधकाम खात्याची सीबीआय चौकशी करा

- मिकी पाशेको यांची जोरदार मागणी
कमिशनवर खाते चालल्याचा आरोप राजकारणात घराणेशाही घातक
मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी): भ्रष्टाचाराने बरबटून गेलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील एकंदर कारभाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी बाणावलीचे आमदार व माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. त्यासाठी आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा संकेत दिला. भरीव कमिशन घेऊन ठेकेदारांना कामे वाटली जात असल्यामुळे गोव्यातील सर्वच रस्ते निकृष्ट दर्जाचे बनलेले आहेत व त्यासाठीच सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव व त्यांच्यामधील संघर्षाला आता नवा आयाम प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आज बेताळभाटी येथील आपल्या कार्यालयात खास बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बाणावली मतदारसंघातील रस्त्यांबाबत आलेमाव यांनी आपणावर केलेले सर्व आरोप त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह फेटाळून लावले. यावेळी त्यांनी सांगितले की, उलट बाणावलीतील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामांबाबत बांधकाम खाते मंत्र्याकडून सापत्न भावाची वागणूक दिली गेली. २००७ ते २०१० पर्यंत २० कोटी रु.ची १९ कामे बांधकाम खात्याने अडवून ठेवलेली आहेत व त्यामुळेच बाणावलीतील अंतर्गत व महत्त्वाचे रस्ते खराब झालेले आहेत. २००२ मध्ये सुदिन ढवळीकर हे बांधकाम मंत्री असताना सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते, त्यानंतर ते झालेले नाही. उलट तीन महिन्यांपूर्वी केलेला मुंगुलपर्यंतचा रस्ता पार उखडून वाहतुकीस निरुपयोगी झालेला आहे व त्यावरून सदर खात्यातील भ्रष्टाचाराची कल्पना येते. गोव्यातील राजकारणात घराणेशाही आणावयाच्या प्रयत्नांना त्यांनी जोरदार आक्षेप घेतला व सांगितले लोक आता शहाणे झालेले आहेत, त्यांना नेहमीच फसविता येणार नाही हे लक्षात ठेवण्याची वेळ आलेली आहे.
पत्रकार परिषदेस बाणावलीच्या सरपंच कार्मेलीन फर्नांडिस, माजोर्डाचे विजीतेसांव सिल्वा, बेताळभाटीचे मिंगेल परेरा, उपसरपंच, पंच तसेच जिल्हापंचायत सदस्य श्रीमती नेली रॉड्रिगीस उपस्थित होत्या.
भारतीय स्वातंत्र्यदिनी बाणावली येथे वालांका आलेमाव यांच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी चर्चिल आलेमाव यांनी आपणावर केलेल्या टीकेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, बाणावलीचा विकास का व कोणामुळे खुंटला हे लोकांना चांगलेच माहीत आहे. विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे असताना बाणावलीतील उमेदवारीची घोषणा करण्याची वेळ त्यांच्यावर का यावी? कचेरीचे उद्घाटन का करावे लागले? असे सवाल आपणास पडल्याचे ते म्हणाले.
यापूर्वी बाणावलीतून पराभव चाखलेल्यांनी भलत्याच गमजा मारण्याचे टाळावे, त्यात त्यांचेच भले आहे असे सांगून बाणावलीतील जनता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे व त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण तीनदा तेथून निवडून आलो. आठ वर्षे मंत्रिपदी असताना सर्व सामान्यांची विकासकामे केली. प्रसारमाध्यमांनाही ते ठाऊक असून, तेच याबाबतीत योग्य न्याय देऊ शकतील असे सांगून, बांधकाम मंत्र्यांनी विकास कामांसंदर्भात जनतेला फसविण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला त्यांनी दिला. लोकांची कामे घेऊन आपण संबंधित खाते प्रमुखांशी संपर्क साधला व त्यांनी आपली कामे केली. कामासाठी कुणाही मंत्र्यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही. बाणावलीतील लोक, सरपंच, पंच यांना आपण वारंवार भेटतो आणि त्यांना भेटणेच मी माझे कर्तव्य मानतो, असे ते म्हणाले. आगामी निवडणूक बाणावली की नुवेमधून लढवावी ते आपण जनतेच्या पसंतीनुसार ठरवणार असल्याचे मिकी पाशेको यांनी स्पष्ट केले.
२००७ पासून आपण बाणावलीतील विविध रस्त्यांच्या कामांची अंदाज पत्रकांसह केलेली मागणी पत्रकारांना सादर केली व आपण रस्त्याच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केले होते की नाही ते तसेच लोकांची दिशाभूल नेमकी कोण करतो ते कळून येईल. माजोर्डा येथील रेल्वे भुयारी मार्ग येत्या मेपर्यंत पूर्ण होणार असून, त्यासाठी आपण कोकण रेल्वेकडे सतत पाठपुरावा केला मात्र भुयारी रस्ता पूर्ण होऊनही त्याला जोडणारे रस्ते करण्यास बांधकाम खाते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ग्रामीण विकास योजनेची निधी एका नावेली मतदारसंघातच का खर्च केला जातो, असा सवाल त्यांनी केला. बेताळभाटी पंचायतीच्या वरच्या मजल्याचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडत आहे व त्याला हीच मंडळी जबाबदार आहे असे त्यांनी सांगितले. बांधकाम खात्यात अभियंत्यांना कोणताच अधिकार नसून कोणाला निविदा द्यायच्या व न द्यायच्या हे कमिशनाच्या प्रमाणावर ठरविले जाते असा आरोपही त्यांनी केला.
नेली रॉड्रिगीस यांनी बांधकाम खात्याचे अधिकारी सरपंच व अन्य लोक प्रतिनिधीशी उद्धट वागतात असा आरोप केला. १५ ऑगस्टच्या माजोर्डा ग्रामसभेत रस्त्यांबाबत लोकांनी सरपंचांना जाब विचारला व सरपंचांनी सर्व माहिती सांगताच लोकांनी "रस्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी अन्य सरपंचांनी बांधकाम खात्याकडून मिळत असलेल्या सापत्न भावाच्या वागणुकीची माहिती दिली. तसेच पत्रकारांना माजोर्डा-कालाता-मुंगुल हे रस्ते नेऊन दाखविले व त्यासाठी सीबीआयमार्फत बांधकाम खात्याच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी उपस्थित सरपंच व पंचांनी केली.

No comments: