Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 18 August, 2010

मक्का मशिदीतील तो स्फोट 'हुजी'कडून

हिंदू शक्तींना बदनाम करणाऱ्यांना जबर चपराक
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): हैदराबाद येथील मक्का मशिदीत २००८ साली झालेल्या बॉंबस्फोटात हिंदुत्ववादी शक्तींचा हात आहे या केंद्र सरकारने चालवलेल्या प्रचाराला चपराक बसली असून या स्फोटांमागे पाकिस्तानातील हरकत-उल-जिहाद इस्लामी ("हुजी') या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या तपास यंत्रणेने शोधून काढले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनाची नावे घेऊन त्यांना बदनाम करू पाहणाऱ्या शक्तींना जबर चपराक बसली आहे. तसेच, भारतातील अनेक बॉंबस्फोटांत "हुजी' संघटनेचा सहभाग असल्याचा दावाही या देशांच्या तपास यंत्रणेने केला आहे.
अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी (युनो) "हुजी' या दहशतवादी संघटनेवर बंदी घालताना तसेच या संघटनेचा स्वयंघोषित कमांडर इलियास काश्मिरी याला जागतिक दहशतवादी घोषित करताना या संघटनेचा मक्का मशिदीतील बॉंबस्फोटात सहभाग असल्याचे नमूद केले आहे. काश्मिरी याचा "लष्कर ए तोयबा' तसेच "अल कायदा' या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.
"अभिनव भारत' या संघटनेवर संशय व्यक्त करण्यापूर्वी भारतातील तपास यंत्रणेनेही या बॉंबस्फोटामागे "हुजी' या संघटनेचा हात असल्याचे सुरुवातीला म्हटले होते. अमेरिकेने म्हटले आहे की, "हुजी'चे भारत आणि पाकिस्तानात जाळे आहे. या संघटनेने या दोन्ही देशांत अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. तसेच, २००७ साली वाराणशीतही या संघटनेने हल्ला घडवला होता.
अमेरिकेतील आर्थिक खाते आणि कायदा खाते यांचा सल्ला घेऊनच या संघटनेवर बंदी घातली आहे. यामुळे अमेरिकेतून "हुजी' या संघटनेला व मोहंमद ईलियास काश्मिरी यास मिळणाऱ्या मदतीच्या स्त्रोतावर नजर ठेवता येणार असल्याचे म्हटले आहे. या बंदीबरोबरच त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच, त्याच्या विदेश दौऱ्यावर आणि हत्यारे बाळगण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेने भारतात आणि पाकिस्तानात घडवून आणलेल्या हल्ल्यांची यादी उघड करण्यात आली आहे. यात मक्का मशिदीतील स्फोटाबरोबरच, हैदराबादेत २००७ साली झालेले दोन बॉंबस्फोट, कराची येथील अमेरिकी दूतावासासमोरील आत्मघातकी हल्लादेखील "हुजी'नेच घडवून आणल्याचे म्हटले आहे.

No comments: