Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 19 August, 2010

२७ दिवसांत साखळीत तिसऱ्यांदा पूर

सरकार निद्रिस्त, आम आदमीची झोप उडाली
डिचोली, दि. १८ (प्रतिनिधी): साखळीत आज पहाटे ३ वाजता आलेल्या पुरामुळे सरकारी कामकाज किती गलथान आहे याचा प्रत्यय आला. काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे केरीतील अंजुणे धरण तुडुंब भरले. धरणाला धोका निर्माण होताच रात्री २.३० वाजता साखळीवासीयांना कसलीही सूचना न देता पाणी सोडण्याचा पराक्रम तेथील कर्मचाऱ्यांनी केला. पहाटे ३ वाजता बाजारपेठेत पाणी शिरू लागल्याची माहिती काहीजणांनी नगराध्यक्ष आनंद नाईक यांना दिली. त्यावेळी त्यांनी ताबडतोब सरकारी यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारी जावई मात्र निद्रावस्थेत होते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न विफल ठरले. प्रथम त्यांनी पंपहाऊस सुरू करण्यासाठी पंपहाऊसकडे धाव घेतली, पण पंपहाऊसला भले मोठे कुलूप लावून कर्मचारी आपापल्या घरी खुशालपणे झोप घेत होते. नंतर त्यांनी कार्यकारी अभियंता प्रमोद बदामी यांच्याशी संपर्क साधला असता ते स्वत: ६ वाजता साखळीत आले. त्याचवेळी कर्मचारीही पोचले. नंतर पंपहाऊस सुरू करण्यात आले. ३ वाजताच आनंद नाईक यांनी साखळी पोलिसांना धोक्याची सूचना देणारा सायरन वाजविण्यास सांगितले. त्यावेळी मामलेदारांची परवानगी घेतल्याशिवाय सायरन सुरू करता येणार नाही, असे त्यांना उत्तर मिळाले. सायरन तब्बल ५.३० वाजता वाजला. सकाळी पंपहाऊस बंद का होते, अशी विचारणा केल्यानंतर कार्यकारी अभियंत्याने काहीही उत्तर न देता तेथून पळ काढला. पंपहाऊसवरील बेपर्वाईबद्दल साखळी नगरपालिकेने डिचोली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली असून ताबडतोब व्यापारी, सरकारी, अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात यावी, असे निवेदन दिलेले आहे. साखळी बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे फारसे नुकसान झाले नसले तरीही प्रकरण मात्र गंभीर बनलेले आहे. गेल्या २७ दिवसांत तिसऱ्यांदा साखळीत पूर येण्याची घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गाने संताप व्यक्त केला आहे. आम आदमीचे रक्षण करण्याऐवजी सरकार खुशाल झोपा काढत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे. बंदिरवाडा येथील बिगरगोमंतकीयांच्या झोपड्या या पुराच्या तडाख्यामधून वाचल्या. बोडके मैदान, म्हावळंतर रस्ता, बाजार, नंदिरवाडा, भंडारवाडा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पाणी साठले होते.
सरकारने करोडो रुपये पूरनियंत्रण योजनेसाठी खर्च केले. पण त्यासाठी योग्य मनुष्यबळ का दिले नाही,अशी प्रतिक्रियाही काहीजणांनी व्यक्त केली. पूर दिवसा आल्यास त्याविषयी सरकारला कोणीही माहिती देऊ शकतो पण रात्री याचा कसा पत्ता लागेल? त्यामुळे कामगारांना रात्रपाळीसाठी कामाला ठेवा असेही काही नागरिकांनी म्हटले.
प्रतिक्रिया
आनंद नाईक (नगराध्यक्ष)ः काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरापासून आम्हाला पंपहाऊसने तारले होते. पण आज त्याच पंपहाऊसने दगा दिला. आपापल्या जबाबदाऱ्या विसरून तेथील कर्मचारी खुशाल आपल्या घरी झोपा काढत होते. त्यांच्याकडून मला उचित उत्तर अजून मिळालेले नाही. हे प्रकरण गंभीर असून सरकारला याची दखल घ्यावीच लागेल. आम्ही रात्री ११ वाजता नदीची पाहणी केली होती. त्यावेळी पूर येणार म्हणून खात्रीच नव्हती. पर धरणाचे पाणी अचानक सोडल्यामुळे ही आपली ओढवली.
------------------------------------------
दिलीप देसाई (उपनगराध्यक्ष)- वाळवंटीबरोबर इतर लहान नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पूर आला होता. रात्री २ वाजता हरवळे धबधबा येथील पाण्याची पातळी वाढून ती पायऱ्यापर्यंत आली होती. एकूणच हा पूर नैसर्गिक असून आम्ही त्यापुढे हतबल झालो.
----------------------------------------------------
भानुदास नाईक (मुख्याधिकारी, साखळी)- कोणाकोणाचे किती नुकसान झाले याचा पंचनामा करण्यासाठी ३ तलाठी मागविले आहेत. त्याच्या अहवालानंतर किती नुकसान झाले याचा अंदाज येईल. एकूण झालेला प्रकार मात्र विकासकामांना गालबोट लावून गेला आहे. पंपहाऊससाठी २४ तास कामगारांची गरज आहे. यासाठी आता आम्ही सरकारकडे याविषयी मागणी करणार आहोत.
----------------------------------------------------
सदानंद काणेकर (कोकणी चळवळीचे कार्यकर्ते)- पोर्तुगीज काळात साखळीची जी परिस्थिती आहे आजही तशीच आहे. सरकारने करोडो रुपये पूरनियंत्रणासाठी मोजले. पण सगळे रुपये वाळवंटीत जमा झाले. सरकार पूरनियंत्रणाच्या नावाखाली नको तिथे पैसे खर्च करतात. त्यामुळे हे होतच राहणार. आज वयाची मी ७५ वर्षे गाठली लहान असताना आजोबा पुराविषयी गोष्टी ऐकत होतो त्या आजही तशाच आहे. सरकारी खाऊ वृत्तीच याला जबाबदार आहे.
दिगंबर नाईक (पाळी गट कॉंग्रेस अध्यक्ष) - आमदार हैदराबादला गेले आहेत. आपण एकूण परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना त्यांना दिलेली आहे. त्यांच्यामार्फत सरकारकडे हा प्रश्न मांडला जाईल.

No comments: