Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 18 August, 2010

वेश्याव्यवसायाच्या प्रमुख दलालासह चौघांना अटक

दोन तरुणींची सुटका
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गोव्यात वेश्याव्यवसाय चालवणारा मुख्य दलाल कृष्णगोपळ कुमार (४०) याच्यासह त्याच्या अन्य तीन साथीदारांना आज सापळा रचून अटक करण्यात आली. यावेळी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या महाराष्ट्रातील २० व २५ वर्षीय दोन तरुणींची सुटका करण्यात आली.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण व पेडणे पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या एका मोहिमेत मालपे पेडणे येथे सापळा रचून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी या प्रकरणात दुर्गेश ऊर्फ दीपक राय बेलपूरी (३१) कळंगुट येथील राज (५०) व राजेश कुमार या तिघांना अटक केली. तसेच, तरुणी पुरवण्यासाठी आणलेले वाहनही जप्त केले असून त्या दोन्ही तरुणींची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती यावेळी निरीक्षक मंजूनाथ देसाई यांनी दिली. या प्रकरणाची पेडणे पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
कृष्णगोपाळ कुमार हा वेश्याव्यवसाय प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभाग, पर्वरी तसेच फोंडा पोलिसांना हवा होता. गोव्यातच तळ ठोकून गेल्या अनेक वर्षापासून तो हा व्यवसाय चालवित होता. मात्र त्याला अटक करण्यात गुन्हा अन्वेषण विभागालाही यश आले नव्हते. अधिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पोलिस या टोळीला अटक करण्याच्या प्रयत्नात होते. गोपाळकृष्ण हा मूळ केरळ राज्यातील असल्याने गोव्यातील त्याचा व्यवसाय दीपक आणि राज सांभाळत होते. पोलिसांनी सर्वांत आधी राज याला अटक करून दीपक व गोपाळकृष्ण यांना अटक करण्यासाठी सापळा रचला. त्यामुळे दोन मुली पाहिजे असल्याचे सांगून बनावट ग्राहक पाठवण्यात आले. यावेळी मालपे पेडणे येथे मुली देण्यासाठी तो आला असता पोलिसांनी मुलीसह कुमार याला अटक केली. कोकणात सावंतवाडी, बांदा येथे या मुली आणून ठेवल्या जात होत्या, अशी माहिती मिळाली असल्याने रात्री पोलिसांनी याठिकाणी असलेल्या एका खोलीवर छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्याठिकाणी काय हाती लागले, याची माहिती मिळू शकली नाही.
गुन्हा अन्वेषण विभागाने छापे टाकून वेश्याव्यवसायात गुंतलेल्या अनेक तरुणींची सुटका केली होती. मात्र मुख्य दलाल कुमार याला ताब्यात घेण्यात त्यांना यश आले नव्हते. तसेच तो मोठी रक्कम मोजून आपली सहीसलामत सुटका करून घेत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या विषयीचा अधिक तपास पेडणे पोलिस करीत आहेत.

No comments: