Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 August, 2010

आण्विक उत्तरदायित्व विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा

आक्षेपार्ह 'ऍण्ड' शब्द वगळला
नवी दिल्ली, दि. २० : प्रमुख विरोधी पक्ष भाजप आणि डाव्या पक्षांच्या दबावापुढे नमते घेत सरकारने आज आण्विक उत्तरदायित्व विधेयकातून आक्षेप असलेला "ऍण्ड' हा वादग्रस्त शब्द वगळल्याने हे विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एघाद्या अणुप्रकल्पात निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई ठरविताना विधेयकातील तरतुदीत असलेल्या "ऍण्ड' शब्दाने ही जबाबदारी कमी होत असल्याचा विरोधी पक्षांचा दावा होता. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा वादग्रस्त शब्द वगळण्याबाबत विचारविनिमय झाला आणि अखेर हा शब्द वगळून हे विधेयक संसदेत मांडण्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिली. विधेयकाच्या सध्याच्या मसुद्यातील दोन उपतरतुदींमध्ये असलेल्या ऍण्ड शब्दावर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला होता.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्थायी संसदीय समितीने शिफारस केलेल्या जवळपास सर्वच महत्वपूर्ण सूचना मंत्रिमंडळाने मान्य केल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी स्थायी समितीने आपला अहवाल संसदेत मांडला होता. आता हे विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक मांडण्याची तारीख निश्चित करण्यात येईल. या विधेयकाबाबत एकमत झाल्याचे दिसत असतानाच डाव्या पक्षांनी विधेयकातील १७(अ) आणि १७(ब) या दोन उपतरतुदींमध्ये "ऍण्ड' हा शब्द टाकल्याने सरकारवर जोरदार टीका केली होती. आधी या विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा करणाऱ्या भाजपानेही डाव्यांच्या सुरात सूर मिसळत हा शब्द वगळण्यासाठी सरकारवर दबाव टाकला होता.

No comments: