Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 19 August, 2010

गुंड सोहराबुद्दीन चकमकप्रकरण मोदींना 'क्लीन चीट'

नवी दिल्ली, दि. १८ : गुंड सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सीबीआयने "क्लीन चीट' दिली आहे. तसेच यासंदर्भात कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावला आहे.
आरोप करणाऱ्या लोकांचा हातमिळवणी करण्यामध्ये हातखंडा आहे. याआधी त्यांनीदेखील असेच साटेलोटे करत सरकारला तारले आहे. त्यामुळे अशी तडजोड करण्यात कोण तरबेज आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. आम्हाला कॉंग्रेेसशी काहीही घेणेदेणे नाही. याप्रकरणी आम्ही सरकारला मुद्यावर आधारीत पाठिंबा देत आहोत', असे भाजपचे ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कॉंग्रेसने भाजपशी साटेलोटे करत आण्विक उत्तरदायित्व विधेयकाला पाठिंबा मिळविला आहे. याकरिता सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सीबीआये क्लीन चीट दिली आहे, असा आरोप आज राजद, सपा, लोजपा आणि डाव्या पक्षांनी संसदेत केला. त्या आरोपांना उत्तर देताना नायडू बोलत होते.
आण्विक उत्तरदायित्व विधेयकासंबंधी भाजपचे जे आक्षेप होते त्यांची योग्य ती दखल घेत सरकारने त्यात आवश्यक बदल केले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर या विधेयकाला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. सरकारला कोंडीत पकडून वैयक्तिक हित साध्य करण्याची आमची प्रवृत्ती नाही, असा टोलाही नायडू यांनी असे आरोप करणाऱ्यांना लगावला.

No comments: