Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 15 August, 2010

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणास केंद्राची मंजुरी

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुंबई- गोवा महामार्गाचे रुंदीकरण व्हावे असा प्रस्ताव केंद्राला सादर करून पाच वर्षे उलटली तरीही हा प्रस्ताव विविध कारणांस्तव रखडत होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच याप्रकरणी केंद्रीय वाहतूकमंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केली व अखेर या प्रस्तावाला चालना देण्याचा शब्द कमलनाथ यांनी त्यांना दिला. या संपूर्ण प्रकल्पाचा उपयुक्तता अहवाल तयार करण्यात येणार असून हे काम महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात येणार असून सहा महिन्यात हा अहवाल तयार करू,असे आश्वासन छगन भुजबळ यांनी केंद्राला दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे पनवेल ते गोवा या सुमारे ४०० किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.उपयुक्तता अहवालावर ३ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या महामार्गावरील रस्ता अपघातांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २३२ दिवसांत केवळ रायगड जिल्ह्यात १४३ अपघातांत ११२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. वाढत्या अपघातांमुळे अलीकडच्या काळात पत्रकार तथा सामाजिक संस्थांतर्फे रास्तारोकोंचे प्रकारही वाढले आहेत.

No comments: