Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 17 August, 2010

पणजीत आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शन

ऑक्टोबरमध्ये आयोजन, सत्तर लाख खर्च अपेक्षित

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - राज्यात पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय "पर्यटन मार्ट'चे (खास प्रदर्शन) आयोजन येत्या १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान पणजीच्या कांपाल येथील बांदोडकर मैदानावर करण्यात येणार असून यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायिक भाग घेणार आहेत. त्यासाठी सुमारे ६५ ते ७० लाख रुपये खर्च येणार आहे. ही माहिती पर्यटन विकास महामंडळाचे संचालक निखिल देसाई यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन संचालक स्वप्निल नाईक, राल्फ डिसोझा, शाल्डन सतवानी व गौरीश धोंड उपस्थित होते.
या मार्टसाठी गोव्याच्या शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना सामावून घेतले आहे. यामुळे पर्यटनाला अधिक बळकटी येईल. तसेच यासंदर्भात गोव्याने महाराष्ट्र, कर्नाटकशी हातमिळवणी केली असली तरी त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटक कमी होणार नाही, असा दावा देसाई यांनी केला.
या "मार्ट'साठी आर्थिक मदत मिळवण्याकरिता केंद्रीय पर्यटन खात्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे केंद्राकडून २५ लाख रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे. या मार्टचा गोव्याला लाभ होणार आहे. याठिकाणी येणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायातील व्यक्तींच्या सुचनांचा फायदा होणार असून त्याद्वारे गोव्यातील पर्यटन व्यवसायामध्ये बदल केले जातील, असे स्वप्निल नाईक यांनी सांगितले. गोव्याला दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशीविदेशी पर्यटक भेट देतात. त्यांना कशा स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देता येतील यादृष्टीने सदर मार्ट फायदेशीर ठरेल, असा आशावाद याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

No comments: