Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 July, 2009

"ग्लोबल इस्पात'च्या भट्टीत प्रचंड स्फोट

५१ जखमी - ३ अत्यवस्थ
कुंकळ्ळी व मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी)- कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील "ग्लोबल इस्पात' या लोखंडी पट्ट्या व सळया तयार करणाऱ्या कारखान्याच्या "स्टील मेल्टिंग' भट्टीत प्रचंड स्फोट झाल्याने येथे काम करत असलेले सुमारे ५१ कामगार जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये कंपनीचे सरव्यवस्थापक यशवंत सिंग यांचा समावेश असून गंभीर जखमी झालेल्यांची नावे ज्योती संतोष काळ (४५), सुरेश रवीदास (१८) व राजेश (४५) अशी आहे. त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी कारखान्यातील भंगार भट्टीत टाकून त्याच्या पट्ट्या व सळया बनवण्याचे काम सुरू होते. यावेळी सदर भट्टीच्या जवळच सिलिंडर असल्याने स्फोटाची तीव्रता वाढली. घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटाची भीषणता एवढी जबरदस्त होती की, स्फोट झाल्यानंतर भट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तर कारखान्याचे पत्र्यांचे छप्पर निम्म्याहून अधिक प्रमाणात फाटले. या पत्र्याचे तुकडे सुमारे ५०० मीटर परिसरात विखुरले गेले. अनपेक्षित झालेल्या स्फोटाने व पत्र्याचे तुकडे अंगावर पडल्याने येथील कामगार रक्तबंबाळ व हादरलेल्या अवस्थेत होते. कारखान्यात सर्वत्र लोहरस पसरला होता व फर्निचर व इतर सामानाचे तुकडे सर्वत्र विखुरलेले होते. यात कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जखमींना त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून बाळ्ळी प्राथमिक उपचार केंद्र व नुसी इस्पितळात व नंतर हॉस्पिसियूत दाखल करण्यात आले. यानंतर तिघांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक गजेंद्र प्रभुदेसाई, केपे पोलिस स्थानकाचे निरीक्षक संतोष देसाई, अधीक्षक मंगलदास देसाई, अधीक्षक ऍलन डिसा यांनी घटनास्थळाला भेट दिली.
स्फोटाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापनाची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता एकही जबाबदार व्यक्ती उपलब्ध होऊ शकली नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश परब यांच्या मते भट्टीत स्क्रॅप टाकताना आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे हा स्फोट होण्याची शक्यता आहे. पूर्ण तपासणी झाल्यावर अंतिम निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू असेही त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याच्या आवारामध्ये भरलेल्या स्क्रॅपमधील काही गॅस सिलिंडरकडे लक्ष वेधून एखाद्या गॅस सिलिंडरमुळे अशी दुर्घटना होऊ शकते का अशी पृच्छा केली असता तशी शक्यता नाकारता येत नसल्याचे श्री. परब यांनी सांगितले.
या स्फोटात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे ः- मंदा माधव नाईक (४०, बाळ्ळी), सोनिया महेश वर्मा (२६), कीर्ती धुरू (४०), सिया संतोष साहू (३०), शोभा गावकर (३०), राय बिंड (४०), राजेंद्र पाल (१८), राजेश तिवारी (२२), राजेश शाह (२५), अंजू ठाकूर (२३), महमद धालिया (२१), अमृतलाल रामा (२३), काळू पाल (३०), हिरालाल यादव (२८), योगेंद्र सिंग, चोडिलाल बिंड, सोनू बिरादर, राजेशकुमार, दर्शनपाल गोम (४०), राजीव चंद्रभान (२५), लाल पाल (२८), राजीव एच. इनाह प्रधान, मुन्ना, संतोष साहू, सुनील, ज्योती काळे, कमल राम पाल, गजेंद्र पाल, शोभा गावकर, रोशन सिंग, खेजुराम, राहू महेश, नवीन रामचंद्रन, रोहिस बिश्वा, भिरू खनू, मुन्ना जयराम, श्रायली इरवारा, रवी ओमप्रकाश, विनोद मंगाळी, मुन्नी रवी, कृष्णकुमार, शामलाल कृष्णकुमार, राजेश कल्लू, के. एच. बाबू, मनोज कार्लू, अमित मिश्रा, बंटी शर्मा, सीताहर, लालजी.

No comments: