Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 July, 2009

"ती' जमीन आम्हाला परत द्या

देसाई कुटुंबीयांची खाण कंपनीकडे मागणी

लीज करार संपुष्टात येऊन साडेचार वर्षे उलटली
जमीन परत करण्यास "सेझा गोवा'ची टाळाटाळ
आंदोलन छेडण्याचा देसाई कुटुंबीयांचा निर्धार

डिचोली, दि. ८ (प्रतिनिधी) - डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे, साखळी येथील देसाई कुटुंबीयांच्या सुमारे २ लाख १६ हजार चौरस मीटर जमिनीतील उत्खननाबाबतचा करार संपुष्टात येऊनही तेथे बेकायदा खनिज उद्योग जोमाने सुरू आहे. विविध खात्यांत याविषयी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने सरकारवर जोरदार टीका करीत आंदोलन छेडण्याचा इशारा देसाई कुटुंबीयांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
"सातीनेचे मळ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जमिनीवर देसाई कुटुंबीय व सेझा गोवा कंपनी यांच्या दरम्यान खनिज उद्योगासाठी "लीज' करार झाला होता. सदर कराराची मुदत साडेचार वर्षांपूर्वीच संपली असून देसाई कुटुंबीयांना सदर जमीन पुन्हा आपल्या ताब्यात हवी आहे. खनिज उत्खनन करणारी कंपनी कराराचे नूतनीकरण न करता बेकायदा उद्योग विस्तार करत आहे. यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका उत्पन्न झाला आहे, असे देसाईंनी सांगितले. या खनिज उद्योगाचा विस्तार आता थेट नागरी वस्तीपर्यंत येऊन पोहोचल्याने इथल्या पारंपरिक विहिरींचे जलस्रोत आटू लागले आहेत. पावसाच्या प्रारंभीच खनिजमिश्रित पाण्याने विहिरी भरल्या आहेत. या दूषित पाण्यामुळे या भागातील रहिवाशांना भर पावसात पिण्यायोग्य पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत खनिजमिश्रित गाळ पोचला आहे. याविषयी डिचोली उपजिल्हाधिकारी, खनिज उद्योग खाते, वनखाते आदींकडे तक्रारी नोंद करूनही या सर्वांनी या सर्व प्रकाराकडे डोळेझाक केली आहे, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. खनिज कंपनीने तेथील नगरसेवकांना हाताशी धरल्याने तेही गप्प आहेत असा आरोप देसाई कुटुंबीयांनी केला. सदर खनिज कंपनीतर्फे बेकायदा वृक्षतोडीचे प्रकार सुरू असून या कृत्यांना विरोध केल्यानेच आमच्यावर खोटे खटले गुदरण्यात आल्याचेही देसाई कुटुंबीयांनी पुढे सांगितले. कंपनीने आमच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कराराप्रमाणे सदर जमीन आमच्या ताब्यात द्यावी, अन्यथा आमच्या हक्कासाठी आम्हाला आक्रमक भूमिका घेणे भाग पडेल असे देसाई कुटुंबीयांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला विनायक गणपतराव देसाई, चंद्रकांत जयवंतराव देसाई, विक्रांत भालचंद्र देसाई, चंद्रजित जयवंतराव देसाई, रामचंद्र जयवंतराव देसाई, आनंदराव व्यंकटराव देसाई आदी उपस्थित होते.

No comments: