Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 July, 2009

महिला कामगारांच्या साह्याने कळणेत रस्ता करण्याचा प्रयत्न

सावंतवाडी, दि.४ (प्रतिनिधी)- कळणे येथील प्रस्तावित मेसर्स मिनरल ऍण्ड मेटल कंपनीने कळणे ग्रामस्थांचा विरोध डावलून सर्व्हे क्र. ५७ मध्ये जाण्यासाठी आज पायवाट तयार केली. महिला आंदोलकांना शह देण्याच्या उद्देशाने रस्ता करण्यासाठी सुमारे ७० हून अधिक महिला कामगार खाण कंपनी प्रशासनाने रोजंदारीसाठी आणले होते. ग्रामस्थांनी यात हस्तक्षेप केल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी कंपनीने यापूर्वीच दिली होती.
अतिवृष्टीत आणि पूरजन्य परिस्थितीत कळणेवासीय शेतीच्या कामांत गुंतलेले असताना कंपनीने ही पायवाट केली. दरम्यान, कंपनीच्या मालकीच्या सर्व्हे नं.५७ मध्ये जाण्यासाठी वेगळी सार्वजनिक पायवाट अस्तित्वात नाही, तर कंपनीने पुन्हा एकदा कळणे ग्रामस्थांच्या जमिनीत अतिक्रमण केल्याचा दावा सर्व्हे नं.५७ व सर्व्हे नं. ६० चे हिस्सेदार आनंद देसाई यांनी केला आहे.
१६ मार्च रोजी खाण कंपनीने सर्व्हे क्र. ६० मध्ये अनधिकृतरीत्या आपले ७० हून अधिक सुरक्षारक्षक घुसवून २.कि.मी चा रस्ता करून घेतला होता. यावेळी जमिनीतील झाडांची तोड करून तब्बल १ लाख ५५ हजार रुपयांची नुकसानी केली होती, त्यासाठी प्रांतअधिकारी नंदकुमार जाधव यांनी कंपनीला दंड ठोठावला आहे.
मात्र, कंपनीने न्यायालयाचे सीमांकन आदेश मिळवण्यापूर्वी सर्व्हे नं. ५७ मधील महसूल प्रशासनाने जप्त केलेली यंत्रसामग्री (डोझर) बाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. या प्रकरणी महसूल प्रशासनाकडे कंपनीने सर्व्हे नं.५७ मध्ये अनधिकृत प्रवेश करून नुकसानी केल्याची तक्रार दाखल करण्याचा निर्णय सर्व्हे नं.५७ चे भागधारकांनी तसेच कळणेवासीयांनी घेतला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कंपनी विरुद्ध कारवाईची एकमुखी मागणी कळणेवासीयांनी केली आहे.
८ जुलै पूर्वी दोषारोपपत्र दाखल होणार
कळणे खाण आंदोलनात १९ मार्च ०९ रोजी खाण कंपनी सुरक्षा रक्षकाच्या अपघाती मृत्युप्रकरणी १६ आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेल्या ३०२ खुनाच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र ८ जुलै ०९ पूर्वी दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १६ पुरुष आंदोलकांवर ३०२ खुनाचा गुन्हा दाखल केला तरी खाण विरोधी आंदोलन महिलांनी समर्थपणे सुरू ठेवलेले आहे. कळणे आंदोलनातील स्त्रीशक्तीला शह देण्यासाठी कंपनीने महिला कामगारांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. . महिलांच्या शक्तीला आव्हान देण्यासाठी या महिला कामगारांना तैनात केल्याने कळणेतील पुरुष आंदोलक पुढे येण्यास धजावणार नाही, अशी शक्कल यावेळी कंपनीने लढवल्याचे दिसून येत आहे.

No comments: