Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 July, 2009

आता ग्रामीण इस्पितळे "गोमेकॉ' शी जोडणार

- खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव रद्द
- रक्तदानपूर्व "एएनटी'चाचणीही सक्तीची होणार
- ५ ग्रामीण आरोग्य केंद्रात आपत्कालीन विभागांची स्थापना


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)- गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ आता म्हापसा, फोंडा, मडगाव, काणकोण व साखळी इस्पितळांनाही मिळणार आहे. ही सगळे इस्पितळे गोमेकॉशी जोडली जाणार आहेत. राज्यात खाजगी आरोग्य महाविद्यालयांचा विषयही निकालात काढून गोमेकॉत सध्याच्या शंभर विद्यार्थिसंख्येत वाढ करून आणखी शंभर विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी भारतीय आरोग्य मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य आरोग्य सल्लागार मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आरोग्य सल्लागार मंडळाची महत्त्वाची बैठक दोना पावला येथील हॉटेल सिदाद दी गोवा येथे झाली. या बैठकीला गोमेकॉचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल, आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई, आरोग्य सचिव संजीव श्रीवास्तव व समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. राज्यातील आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आरोग्य खात्याने नियोजित कार्यक्रम आखला आहे. येत्या ३१ ऑगस्ट २००९ पर्यंत विविध महत्त्वाचे उपक्रम मार्गी लावण्याचा निर्धार खात्याने केला आहे, असे ते म्हणाले. १४ जून २००८ पासून नवजात अर्भक चाचणी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. एका वर्षांत सुमारे ८ हजार नवजात अर्भकांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत ५३ नवजात अर्भकांत जन्मजात दोष आढळून आले. बहुतेक दोष हे पचनक्रियेशी संबंधित हातळ, त्यांच्यावर वेळीच उपचारही करण्यात आला. या चाचणीमुळे ५३ नवजात अर्भकांचे प्राण वाचवता आले, अशी माहितीही यावेळी श्री. राणे यांनी दिली. अर्भक चाचणीचा हा उपक्रम आता सरकारी व खाजगी इस्पितळांसाठीही सक्तीचा करण्यात येईल.
रक्तदानासाठी आवश्यक "एएनटी' ही रक्तदोष तपासणीची चाचणीही सक्तीची करण्यात येईल. याप्रकरणी जुलै महिन्यात होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात सार्वजनिक आरोग्य कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक सादर केले जाणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले. "ईएमआरआय' ची १०८ रुग्णवाहिका सेवा ही चांगलीच यशस्वी ठरली आहे. आता या सेवेच्या साहाय्यानेच काणकोण, साखळी, चिखली, कुडचडे व कांदोळी येथील आरोग्य केंद्रांवर आपत्कालीन विभाग स्थापन करण्यात येणार आहे. या विभागांमुळे अपघात किंवा हृदयाशी संबंधित आपत्कालीन प्रसंगी प्राथमिक उपचारांची सोय करून रुग्णांना सावध करून नंतर मुख्य इस्पितळात हालवता येणे शक्य होणार आहे. "ईएमआरआय' संस्थेतर्फे विशेष वैद्यकीय प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या ३० विशेष आरोग्य साहाय्यकांना या विभागांवर नेमण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.
म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ सुरू करण्यासाठी सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची गरज आहे व ही नोकरभरती लवकरच केली जाईल, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले. या इस्पितळाच्या व्यवस्थापनासाठी "पीपीपी' अर्थात सार्वजनिक - खाजगी भागीदारीची कोणती पद्धत अवलंबली जावी, याचा निर्णयही लवकरच घेणार असल्याचे ते म्हणाले. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी "नोव्हाडिस्क' या संस्थेशी केलेल्या करारानुसार इन्सुलीनची सोय ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येईल. कासावली येथे रुग्णांची संख्या जास्त असल्याने तेथील घरांत फिरून ही विशेष इन्सुलीन इंजेक्शन दिली जाणार आहे. या कामी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. स्तन कर्करोगाबाबत येथील ग्रामीण भागातही चाचणीची सोय केली जाईल. "बेस्ट फ्रेंड' या दुबईस्थित विश्वस्त संस्थेकडून स्तन कर्करोगाबाबत जागृती करण्यासाठी एक विशेष सीडी काढण्यात आली आहे. ही सीडी स्थानिक भाषेत रूपांतरित करून त्या माध्यमाने या जटिल प्रश्नाबाबत महिलांत जागृती निर्माण करण्यात येणार आहे. सर्व्हायकल कर्करोगाबाबत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी "पाथ' या संस्थेकडे लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. या व्यतिरिक्त बायोमेट्रीक स्मार्ट कार्ड योजना, वैद्यकीय पार्क योजना आदींबाबतही चर्चा करण्यात आली. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध इस्पितळांच्या बांधकामाबाबतची माहिती यावेळी सल्लागार मंडळापुढे ठेवण्यात आली. हे सर्व उपक्रम येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास नेण्यात येईल, असा निश्चयही यावेळी करण्यात आला.

No comments: