Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 July, 2009

कळण्याला हात लावाल तर याद राखा

आर. आर. पाटील यांचा सज्जड इशारा
सावंतवाडी, दि. ८ (प्रतिनिधी) - येथील लाल मातीला हात लावाल तर याद राखा, धुळ्याच्या कोणा पाटलांनी येथे येऊन जमीन उसकवू नये, जे काय करायचे असेल ते आपल्या काळ्या मातीत करावे, असा सज्जड इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज कुडाळ येथे दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनिंग व औष्णिक प्रकल्पांबाबत बोलताना आर. आर. पाटील यांनी खाण समर्थकांना चांगलेच फैलावर घेतले. सिंधुदुर्गातील लाल मातीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खाणी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी धुळ्याचे विनय पाटील या कळणे येथील मे. मिनरल अँड मेटल कंपनीला नाव घेऊन दिला. या उन्मत्त पैसेवाल्यांशी लढायला मी स्वतः तयार आहे. काहीही झाले तरी आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही, असे त्यांनी सुनावले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था कोल्हापुराच्या रंकाळ्यातील नंदीसारखी होत चालली आहे. म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरोगामी विचार घेऊन पुढे जाईल, असे त्यांनी ठासून सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार गुरुनाथ कुलकर्णी, पक्ष निरीक्षक भास्कर जाधव, मत्स्योद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष कुलदीप पेडणेकर, संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सुभाष मयेकर, प्रज्ञा परब, नगराध्यक्ष सौ. पल्लवी केसरकर, अमित सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कुडाळ ओंकार डिलक्स सभागृहात आज राष्ट्रवादीच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ आर. आर. पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. त्यानंतर हा मेळावा पार पडला. त्यात सिंधुदुर्गातील खाण व औष्णिक प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधात पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. राष्ट्रीय कॉंग्रेसबरोबर असलेल्या आघाडीबाबत या मेळाव्यात नाराजीचा सूर व्यक्त झाला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने कॉंग्रेसला मदत केली. आता जिल्ह्यातील तिन्ही जागा आम्हाला देऊन कॉंग्रेसने सहकार्याचा हात पुढे करावा, असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी सांगितले. महिलांना विधानसभेत पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे, अशी मागणी सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पल्लवी केसरकर यांनी केली. कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेतही ५० टक्के वाटा द्यावा, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
खाणप्रश्नी समिती नेमा
खाणप्रश्नी जारी झालेल्या अधिसूचनेबाबत एका अभ्यास समितीची स्थापना करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना करणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला जर आमच्याबरोबर यायचे नसेल तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, असा इशाराही त्यांनी जाता जाता दिला.

No comments: