Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 10 July, 2009

आता शेतकरी ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

धारगळ क्रीडानगरी प्रकरण

पणजी, दि.९ (प्रतिनिधी) - नियोजित क्रीडानगरीतून आपली शेत जमीन वगळण्यात यावी, अशी मागणी करणारे विर्नोडा येथील शेतकरी केवळ या जमिनीचे राखणदार श्री देव बांदेश्वराला साकडे घालून गप्प बसले नाहीत तर त्यांनी याविषयी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचीही जय्यत तयारी सुरू केली आहे. सरकारकडून कशा पद्धतीने ही शेतजमीन बळकावली जात आहे, याबाबत कागदपत्रे जमवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती शेतकरीवर्गाचे नेते श्रीपाद परब यांनी दिली.
धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीचा विषय सध्या बराच तापत आहे. येथील पिडीत शेतकऱ्यांनी राज्य सरकारला आपली शेतजमीन या प्रकल्पातून वगळण्यासाठी १८ जुलैपर्यंत मुदत दिली आहे, अन्यथा २३ जुलै रोजी पेडण्यात मूक मोर्चा आयोजित करून जमीन बचाव आंदोलनाला सुरुवात केली जाईल,अशी घोषणाही केली आहे.धारगळ येथील सदर नियोजित जमिनीत येथील शेतकऱ्यांनी बायागती तयार केल्या असून उत्पन्न देणारी हजारो झाडेही लावली आहेत.यासाठी खुद्द कृषी खात्याच्या योजनांचा लाभ या शेतकऱ्यांनी मिळवला आहे. या भागात तिळारी धरणाचा कालवाही जात असल्याने शेतीसाठी या जमिनीचे महत्त्व वाढण्याची शक्यता असताना ही जमीन क्रीडानगरी उभारण्याचा घाट घातल्याने येथील शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध चालवला आहे. धारगळचे आमदार तथा क्रीडामंत्री बाबु आजगांवकर यांच्याकडून शेतकरीवर्गाला डावलून आपल्या समर्थकाकरवी क्रीडानगरीच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार सुरू आहे. मुळात शेती करणे हा मूर्खपणा आहे व एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीत शेतीसाठी हट्ट करणे अनाठायी असल्याची भाषाही त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. दरम्यान,आत्तापर्यंतच्या सरकारच्या भूमिकेचा विचार केला असता जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर अनेक निर्णय लादण्याचेच प्रकार या सरकारकडून घडले आहेत. सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार या भ्रमात न राहता प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारीही या शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. दरम्यान, लवकरच याप्रकरणी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, केंद्रीय क्रीडा व्यवहारमंत्री तसेच राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना निवेदन सादर केले जाणार आहे. या जागेसंबंधीची सर्व कागदपत्रे जमवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून कोणत्याच पद्धतीत सरकारसमोर नमणार नाही,असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे,अशी माहितीही श्रीपाद परब यांनी दिली.

No comments: