Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 July, 2009

६ इंच पावसाची नोंद

पणजी, डिचोली व वाळपई, दि. ४ (प्रतिनिधी)- गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसाचा तडाखा आजही कायम राहिला. मागच्या दोन दिवसांचा विक्रम मोडत आज २४ तासांत एकूण ६ इंच पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचा जोर पाहता येत्या चोवीस तासांत पाऊस अर्धशतक ओलांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे डिचोलीत पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सरकारच्या पूरनियंत्रण कामांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने विद्यमान सरकारने डिचोलीवासीयांची थट्टाच चालवल्याचा सूर आज अनेकांनी व्यक्त केला.
काल रात्रीपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम राहिला. विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने अनेकांची धांदल उडाली. राजधानीत रस्त्यावर पाणी भरल्याने दुकानदारांवर आपले व्यवसाय बंद करण्याची नामुष्की ओढवली. रस्त्यावरील पाणी वाहनांच्या येरझाऱ्यामुळे सरळ दुकानात आत शिरू लागल्याने त्यांना आपले व्यवसाय बंद करणे भाग पडले. गेले तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे आजही अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले. पणजी भाटले येथे एका जुन्या घराची मातीची भिंत कोसळल्याने बरेच नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. कला अकादमी ते मिरामार पर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांची खास करून दुचाकी चालकांची बरीच धांदल उडाली. काही वाहन चालक रस्त्यावर पाणी भरल्याने वाहन सावकाश हाकायचे सोडून जाणीवपूर्वक वाहने वेगात हाकत असल्याने फुटपाथवर चालणाऱ्या लोकांची बरीच पंचाईत होत असल्याच्या तक्रारी आल्या.
डिचोलीत नागरिकांत पुराची घबराट
डिचोलीत सरकारने राबवलेल्या पूर नियंत्रण उपाय योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. डिचोलीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची झोप उडविली असून पुराचे संकट टळो असे म्हणून येथील लोक प्रार्थना करीत आहेत. डिचोलीतील पुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची योजना मंजूर केली असली तरी भर पावसात कामाला सुरुवात केल्याने जनतेचा पैसा पाण्यात गेला आहे. या प्रकाराबाबत डिचोलीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आज सकाळपासूनच डिचोलीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायला सुरुवात झाली. दुपारी येथील पाण्याची पातळी वाढू लागली आणि शांतादुर्गा हायस्कूलजवळील डिचोली अस्नोडा रस्त्यावर वाहने चालविणे धोकादायक बनले. बगल रस्त्यावरून येणारी वाहने भायली पेठ मार्गे वळविण्यात आली. येथील मुख्य नाल्यावरूनही पाणी वाहू लागले. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हे पाणी ओसरले असले तरी पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर येथे केव्हाही पूर येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, पुराची परिस्थिती ओढवल्यास सर्व सरकारी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. खनिज मालाचे साठे पाण्याच्या लोटाबरोबर नागरिकांच्या घरात घुसत असल्याने लोकांचे बरेच नुकसान झाले आहे. सुर्ला गावातील रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
वाळपई बाजारपेठ जलमय
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसाने वाळपई तालुक्यालाही झोडपून काढले. वाळपई बाजारपेठेतील रस्ते पाण्याखाली गेले होते तर वेळूस येथील म्हादई नदी पाण्याने तुडुंब भरून वाहत होती. वाळपई - होंडा रस्ताही ठिकठिकाणी पाण्याखाली गेल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने संध्याकाळी थोडीफार विश्रांती घेतली. वाळपईत अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना जोर आला असून शेतकरी आपल्या कामात मग्न असल्याचे दिसून आले.

No comments: