Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 7 July, 2009

अर्थमंत्र्यांच्या भाषणाने लोकसभेला "झोपविले'!

रवींद्र दाणी
नवी दिल्ली, दि. ६ - अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पाने आज शेअर बाजाराला तर झोपविलेच, शिवाय लोकसभेलाही झोपविले. आजचा अर्थसंकल्प मुखर्जींसाठी रौप्य महोत्सवासारखा होता. २५ वषार्र्ंपूर्वी त्यांनी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता, तर आज त्यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी सरकारचे अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला.
मुखर्जीचे भाषण सुरू झाले आणि या भाषणाचा परिणाम मुंबई-दिल्ली दोन्ही टिकाणी होऊ लागला. मुंबईतील शेअर बाजार कोसळू लागला, तर अर्थमंत्री ज्या सभागृहात उभे राहून भाषण देत होते ते सभागृह डुलक्या देऊ लागले.
सत्ताधारी पक्षाला आज जोरदार अर्थसंकल्पाची अपेक्षा होती. लोकसभेतील विजयाला साजेसा अर्थसंकल्प प्रणवबाबू सादर करतील अशी अपेक्षा ठेवून सत्ताधारी सदस्य आले होते. पण, त्यांची निराशा होत होती. राज्यमंत्री सचिन पायलट असोत की त्यांचे सहकारी दीपिंदरसिंग हुडा असोत त्यांना डुलक्या येत होत्या. कॅबिनेट मंत्री कु. शैलजा यांचेही डोळे अधून मधून मिटत होते. तर मागील बाकावर बसलेले आंध्रप्रदेशातील एक खासदार प्रणवबाबू आपले भाषण संपवून खाली बसल्यावरच उठले. अर्थात झोपेतून.
सपाच्या खासदार जयाप्रदा यांनाही डुलक्या येत होत्या. अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी आणि समजण्यासाठी त्यांना बरेच परिश्रम करावे लागत आहेत, असे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
कम्युनिस्ट सदस्य अर्थकारणातील तज्ञ समजले जातात. पण, माकप नेते वासुदेव आचार्य यांच्या डोळ्यांवर अर्थसंकल्पाचा तणाव दिसत होता. भाजप बाकावर शेवटच्या रांगेत बसलेले दोन सदस्यही मस्त डुलक्या देत होते.
दीर्घा रिकामी
राज्यसभेची लोकसभेतील दीर्घा आज बरीचशी रिकामी होती. नंतर कळले की भाजपचे बहुतेक सदस्य राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांच्या कक्षात बसून अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकत होते.

No comments: