Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 July, 2009

शिवसेनाप्रमुखांवर एंजिओप्लॅस्टी

मुंबई, दि. ७ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आज येथील लीलावती रूग्णालयात पाच डॉक्टरांच्या चमूने यशस्वी शस्त्रक्रिया केली. प्रकृतीतील सुधारणा पाहून येत्या तीन ते चार दिवसांत श्री. ठाकरे "मातोश्री'वर परतू शकतील, असा विश्वास डॉ. सॅम्युअल मॅथ्यू (लंडन) यांनी व्यक्त केला आहे.
श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर काल सकाळी शिवसेनाप्रमुखांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर एंजिओप्लॅस्टी करण्याचे निश्चित केले होते. तथापि, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे अमेरिकेत असल्याने ते आल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार उद्धव काल रात्री परतल्यानंतर आज सकाळीच एंजिओप्लॅस्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी खास लंडनहून आलेले डॉ. सॅम्युअल मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ८३ वर्षीय बाळासाहेबांवर यापूर्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती. मात्र सर्जरी झालेल्या ठीकाणी रक्तनलिकेत पुन्हा "ब्लॉक' तयार झाल्याने त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. आज त्यांच्यावर एंजिओप्लॅस्टी करून रक्तनलिकेतील हे ब्लॉक काढून टाकण्यात आले.
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि लीलावती रूग्णालयाचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. सॅम्युअल मॅथ्यू यांनीदेखील एंजिओप्लॅस्टी यशस्वी झाल्याचे सांगून शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीतील सुधारणा लक्षात घेऊन त्यांना पुढील तीन चार दिवसात घरी पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
या शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार मनोहर जोशी यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. यावेळी रूग्णालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली होती.
दरम्यान गुरूपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी "मातोश्री'वर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी उसळत असते. प्रत्येक शिवसैनिकांना भेटने शक्य नसले तरी शिवसेनाप्रमुखांचे नुसते दर्शनदेखील शिवसैनिकांना प्रेरणादायी असते. गुरूपौर्णिमेदिवशीच शिवसेनाप्रमुखांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने शिवसैनिकांनी "मातोश्री'वर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे शिवसैनिकांत थोडे निराशेचे वातावरण होते. मात्र, आज गुरूपौर्णिमेदिवशीच त्यांच्यावर एंजिओप्लॅस्टी असल्याने शिवसैनिकांनी गुरूवर्य शिवसेनाप्रमुखांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.

No comments: