Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 10 July, 2009

"स्वाईन फ्लू'च्या आणखी एका रुग्णावर उपचार

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - अमेरिकेतून परतलेल्या ३१ वर्षीय तरुणाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे चाचणीत निश्चित झाले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र तांबा यांनी दिली. त्या रुग्णाची तब्येत पूर्णपणे सुधारली असून येत्या काही दिवसांत त्याला घरी पाठवले जाणार आहे. गोव्यात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या दोन रुग्णाची नोंद झाली आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णावर पाच दिवस उपचार करावा लागतो. अशा रुग्णाला "टेमीफ्ल्यू" ही गोळी दिली जाते,अशी माहिती डॉ. तांबा यांनी दिली.
एका रुग्णामुळे शंभरच्या आसपास लोकांना "टेमीफ्ल्यू'ची गोळी द्यावी लागत आहे. त्यामुळे अमेरिका आणि इंग्लंड मधून परतलेल्या व्यक्तीच्या किंवा नातेवाइकांच्या दोन दिवस जवळ न जाण्याचा आणि किमान एक मीटर लांब राहण्याचा सल्ला डॉ. तांबा यांनी दिला आहे. विदेशातून परतलेल्या व्यक्तीला ताप किंवा खोकला येत नसल्यास त्याला या 'फ्ल्यू'ची लागण झालेली नाही, असे ग्राह्य धरता येते, असे त्यांनी सांगितले.
सदर ३१ वर्षीय रुग्ण मुंबईमार्गे गोव्यात पोचला होता. दि. ५ जुलै रोजी गोव्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या अंगात ताप भरला. त्यामुळे तो गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी गेला. हा रुग्ण विदेशातून परतल्याची माहिती मिळताच येथील डॉक्टरांनी त्याला थेट चिखली येथील कुटीर रुग्णालयात जाण्यास सांगितले. हा "फ्ल्यू' अधिक फैलावू नये यासाठी दि. ५ आणि ६ जुलैच्या या दोन दिवसात सदर रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना "टेमीफ्ल्यू'गोळी देण्याची सत्र आरोग्य खात्याने सुरू केले आहे. सदर रुग्ण गोमेकॉत गेला होता, त्यावेळी "कॅज्युल्टी'मध्ये कोण कोण उपस्थित होते, त्याचप्रमाणे त्याच्यासह मुंबईतून गोव्यात आलेल्या त्या विमानातील सहप्रवाशांची यादी आरोग्य खात्याने मिळवली असून त्या सर्वांना ही गोळी दिली जाणार असल्याची माहिती डॉ. तांबा यांनी दिली.
दि. ६ जुलै रोजी गोमेकॉच्या केज्युल्टीत डिचोली, सत्तरी व काणकोण या भागातील रुग्ण आले होते. त्यामुळे या लोकांना संपर्क साधणे कठीण होत असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे या रुग्णाच्या घरातील आणि त्याला भेटण्यासाठी आलेल्या सर्व नातेवाइकांना ही गोळी देण्यात आली असल्याचेही डॉ. तांबा यांनी सांगितले.

No comments: