Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 July, 2009

'बांदेश्वरा, आता तूच ह्यांका बघून घे'

शेतकऱ्यांकडून देवाला बकरा अर्पण
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): 'देवा श्री बांदेश्वरा, आता तूच ह्यांका बघून घे रे बाबा' क्रीडानगरी प्रकल्पातून आपली जमीन वगळावी यासाठी धडपडणाऱ्या विर्नोडा व धारगळ गावातील शेतकऱ्यांनी आता या क्षेत्राचे राखणदार श्री बांदेश्वर देवालाच परवा सामूहिक साकडे घातले आहे. देवाच्या नावाने त्यांनी एक बकराही अर्पण करून या लढ्यात मदतीसाठी चक्क देवालाच आवाहन केले आहे. क्रीडानगरी प्रकल्पाला कुणाचाही विरोध नाही परंतु त्यासाठी रक्ताचे पाणी करून पीक घेतलेल्या जमिनीवर बुलडोझर फिरवण्यासाठी क्रीडामंत्री बाबू आजगांवकर एवढे उतावीळ का झाले आहेत, असा सवालच या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
क्रीडानगरीवरून सध्या संपूर्ण पेडणे तालुकाच ढवळून निघाला आहे. एकीकडे आपल्या भावीपिढीसाठी जपून ठेवलेली व घाम गाळून उत्पन्नाचे साधन निर्माण केलेली शेतजमीन वाचवण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी जिवाची बाजी लावली आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष करून सरकारने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवणारी सभा झाल्यानंतर लगेच तालुक्यातील काही पंचायती व जिल्हा पंचायत सदस्यांना एकत्र करून या क्रीडानगरीला पाठिंबा दर्शवण्यासाठीची बैठक घेण्यात आली आहे. क्रीडानगरीच्या या लढ्याला काही लोक राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न करीत असल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे स्वरक्षणार्थ उभे ठाकलेल्या शेतकऱ्यांनी सरकारऐवजी आता चक्क देवावर भरोसा ठेवून आपला लढा आता तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
क्रीडानगरीमुळे शेती, भाती आणि निसर्गाची होणारी हानी, आटणाऱ्या विहीरी आणि झरे, नष्ठ होणारी शेती असे अनेक प्रश्न असताना त्याकडे बेदरकारपणे दुर्लक्ष करण्याचे धोरण राजकर्त्यांनी चालू ठेवल्याने यापुढे पेडण्याच्या गावागावात सभा घेऊन जनजागृती आणि विरोध तयार करण्याचे काम इथल्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. मुळात शेतकऱ्यांचा क्रीडानगरीला विरोध नाही. विरोध आहे तो सुपीक जागेत क्रीडा नगरी येण्याला, असे स्पष्टीकरण विर्नोडा गावचे प्रतिष्ठित नागरिक श्रीपाद परब यांनी केले आहे. पेडणे तालुक्यात इतरत्र अनेक ठिकाणी नापीक आणि खडकाळ जमीन आहे. तिथे पीक घेणे किंवा शेती करणे शक्य नाही, अशा जमिनीचा वापर या प्रकल्पासाठी केल्यास त्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही. धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीसाठी सरकारकडून बळजबरीने संपादन करण्यात येणारी जमीन ही शेतीप्रधान आहेच परंतु त्याही पलीकडे या जमिनीचे अनेक कारणांसाठी महत्त्व आहे. ही जमीन येथील शेतकरी कुटुंबीयांच्या भावी पिढीचा आधारस्तंभ आहे तशीच ती संपूर्ण विर्नोडा गावच्या रचनेचा मुख्य भाग आहे. पेडणे तालुक्यातील सर्वांत मोठी वायंगण शेती ही विर्नोडा गावात आहे. धारगळ येथील या जमिनीत या शेतीला पूरक ठरणाऱ्या पाण्याचे स्त्रोत्र असून या जमिनीवर बुलडोझर फिरले तर हे स्त्रोत्र पूर्णपणे नष्ट होईल व त्याचा फटका संपूर्ण विर्नोडा गावाला बसेल असेही श्री. परब यांनी नमूद केले. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, विर्नोडा गावात एक छोटी नदी वाहते व या नदीचे मूळ हे धारगळ येथील नियोजित जागेत आहे. या नदीमुळेच येथील वायंगण शेतीला पाणीपुरवठा होतो व या शेतीवर या गावातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. सरकारने या गोष्टीचा तज्ज्ञांच्या साहाय्याने अभ्यास करण्यास हरकत नाही. मुळात याठिकाणीही खाऱ्या पाण्याची नदी आहे, पण या नदीतून वाहणाऱ्या गोड्या पाण्यामुळे ही शेती टिकून आहे. या नदीचा स्त्रोत्र बंद झाल्यास शेतीत खारे पाणी शिरण्याचा धोका असून त्यामुळे या गावची संपूर्ण जनजीवनच विस्कळीत होऊन लोकांना जगणेच कठीण होणार असल्याचे श्री. परब म्हणाले.
ज्ञातीबांधवांचा पाठिंबा
क्रीडानगरीच्या नियोजित जागेमुळे प्रभावित होणारे विर्नोड्यातील बहुतेक शेतकरी हे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे बांधव आहेत. गेल्याच आठवड्यात या समाजबांधवांची बैठक पेडण्याचे अध्यक्ष संतोष मळीक यांच्या अध्यक्षतेखाली वारखंड येथे झाली. या बैठकीला समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई प्रमुख पाहुणे होते. या बैठकीत विर्नोड्यातील या समाजबांधव शेतकऱ्यांचा विषय उपस्थित करण्यात आला. धारगळ येथील क्रीडानगरीचा विषय हा विर्नोड्यातील समाजबांधवांचा जिव्हाळाचा विषय बनला आहे, त्यामुळे या लढ्याला पाठिंबा देऊन समाजबांधवांचे हित जपणे हे संघटनेचे कर्तव्य आहे, असे मत संतोबा देसाई यांनी व्यक्त केले. विर्नोड्यातील शेतकऱ्यांचा विषय अभ्यासला जाणार व या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे जाणवल्यास संघटनेची संपूर्ण शक्ती या शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभी करू,अशी ग्वाही यावेळी श्री.देसाई यांनी दिली आहे.

No comments: