Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 July, 2009

गिर्दोळी येथे श्रीमहालक्ष्मीच्या मूर्तीचा अज्ञातांकडून विध्वंस

मडगाव,दि.८(प्रतिनिधी)- येथून दहा किलोमीटर अंतरावरील गिर्दोळी येथील रस्त्यालगत असलेल्या श्रीमहालक्ष्मी मंदिरांतील दोन फूट उंचीच्या मूर्तीचा कोणा अज्ञाताने विध्वंस करण्याचा संतापजनक प्रकार आज आढळून आला व त्यामुळे संपूर्ण सासष्टी भागात संतापाची लाट उसळली आहे. कुंकळी-वेरोडा येथील रामनाथ मंदिरांतील मूर्ती व लिंगांच्या विध्वंसानंतर बरोबर अडीच महिन्यांनी आजचा हा प्रकार घडला आहे.
मडगावहून मुगाळी, रायचे तळे च्या मार्गाने जाणाऱ्या व मार्मागेावा स्टील प्लांटपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर मडगाव-चांदर रस्त्यालगत साधारण ५० मीटर अंतरावर हे महालक्ष्मीचे प्राचीन मंदिर आहे. तेथील दोन फूट ऊंच अशी मातीची मूर्ती लांब काठीने भोसकून फोडली व तिचे तुकडे केले गेल्याचे आज सकाळी दिसून आले.
वेरेकर कुटुंबीयांनी साधारण ४० वर्षांपूर्वी इतर गावकऱ्यांच्या सहकार्याने हे मंदिर बांधले होते असे देवालयाचे अध्यक्ष सुदिन वेरेकर यांनी सांगितले. मंदिराला जाळीचा मुख्य दरवाजा आहे व तो बंद केला गेला होता पण त्याला कुलूप लावले नव्हते. या मंदिरालगतच नवे भव्य मंदिर बांधले जात असून ते काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
गुन्हेगारांनी या नव्या बांधकाम चालू असलेल्या मंदिराजवळील फटीतून मागील बाजूने जुन्या मंदिरात प्रवेश केला असावा. त्यांनी मंदिरावर ध्वज लावलेली उंच काठी जी मागच्या बाजूने होती,ती घेऊन ते गर्भागाराबाहेर आले व गर्भागाराच्या जाळीचा दरवाजा न उघडता वा त्याला हातही न लावता एक मीटर उंचीच्या चौथऱ्यावर असलेली मूर्ती त्यांनी बाहेरून काठीने ढोसून भग्न केली असावी, असा कयास केला जात आहे. नंतर त्यांनी काठी तेथेच टाकली व ते मागच्या बाजूनेच पळाले असावेत, असे मानले जाते.
सदर मूर्ती दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तयार करून पुजली जाते व जुनी मूर्ती विसर्जित केली जाते, गेली ४० वर्षे हा प्रघात चालू आहे. दररोज मूर्तीला गंधफूल वाहिले जाते. आजही त्या नित्यपूजेसाठी एक महाजन अरविंद भिसे आले असता त्यांना मूर्ती विध्वंसाचा प्रकार लक्षात आला व लगेच त्यांनी इतरांना कळविले. मायणा कुडतरी पोलिसांना कळविताच निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क, उपनिरीक्षक नवलेश देसाई फौजफाट्यासह तेथे धावून गेले व त्यांनी पंचनामा केला. दुपारी १२ वाजता पणजीहून श्र्वानपथक आणून शोध घेण्यात आला पण ते जुन्या देवळांतून नव्या देवळापर्यंत गेले व परत फिरले. दक्षिण गोव्यातील मूर्तिभंजनाची ही २९ वी घटना आहे व अजूनपर्यंत एकाही प्रकरणाचा तपास लागलेला नाही,
मूर्ती विध्वंसाच्या या प्रकारांचा एक योगायोग म्हणजे नगरविकास मंत्री जोकीम आलेमांव यांचा मतदारसंघातील गेल्या वर्षभरातील हा चौथा प्रकार आहे. पहिला प्रकार वर्षभरामागे पारोडा येथे दुसरा, देव आजोबा कुंकळ्ळी त्यानंतर अडीच महिन्यामागे वेरोडा येथील वेताळ मूर्ती व अन्य लिंगांचा नासधूस व आता हे महालक्ष्मी मूर्ती नासधूस आहे. सायंकाळपर्यंत या प्रकरणी तपासकामाला विशिष्ट अशी दिशा मिळू शकली नव्हती.

No comments: