Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 7 July, 2009

भाजपची सदस्यता मोहीम सुरू

२ लाख प्राथमिक सदस्य नोंदणीचा संकल्प

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी- गोवा प्रदेश भारतीय जनता पक्षातर्फे आजपासून सदस्यता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पणजीचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक लाला राव यांनी पहिला प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरून या मोहिमेला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरापासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत राज्यात घरोघरी भेट देऊन तसेच पक्षाच्या विचारधारेच्या आधारावर प्राथमिक सदस्य नोंदणी केली जाईल. उत्तर व दक्षिण जिल्हा मिळून राज्यभरात सुमारे दोन लाख सदस्य नोंद करण्याचा संकल्प पक्षाने जाहीर केला आहे.
आज पणजी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर,संघटनमंत्री अविनाश कोळी आदी हजर होते. भाजपचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा ६ जुलै हा जन्मदिवस असल्याने सदस्यता मोहिमेसाठी या दिवसाची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आली होती, असेही श्री.आर्लेकर यांनी सांगितले. भाजपच्या संघटनात्मक रचनेत ३३ टक्के महिलांचा समावेश असेल,असेही यावेळी घोषित करण्यात आले. यापूर्वी भाजपचे सदस्य म्हणून झालेली नोंद अवैध बनली असून आता पुन्हा एकदा सहा वर्षांसाठी ही नोंदणी केली जाणार आहे. गेल्यावेळी १ लाख १५ हजार सदस्यांची नोंद झाली होती. यावेळी हा आकडा दोन लाखांवर नेण्याचा संकल्प पक्षाने सोडला आहे.घरोघरी पक्षाचे प्रमुख नेते भेटी देणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ही मोहीम हाती घेण्याचे धाडस एरवी कुणीही करण्यास धजला नसता परंतु भाजपने हीच वेळ साधली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा लोकांशी संपर्क साधण्याचा योग या मोहिमेमुळे प्राप्त होणार आहे,असेही श्री.आर्लेकर म्हणाले.
सध्याची प्राथमिक सदस्यता मोहीम ही ३१ जुलै २००९ पर्यंत सुरू राहील. त्यानंतर सक्रिय सदस्यता मोहीम सुरू होईल. सुरुवातीस बूथ समित्या,मंडळ समिती,जिल्हा समिती,प्रदेश समिती व शेवटी राष्ट्रीय समिती अशी या मोहिमेच्या दिशा असणार आहे. दर तीन वर्षांनी भाजपच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुका होतात व त्यात लोकशाही पद्धतीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होते, हेच या पक्षाचे वेगळेपण असल्याचेही श्री.आर्लेकर यांनी ठासून सांगितले. राज्यात सुमारे १३०० बूथ आहेत. प्रत्येक बूथवर किमान दीडशे ते दोनशे सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.
भाजपबाबत इतर राजकीय पक्षांकडून केला जाणारा अपप्रचार आता हळूहळू लोकांच्या लक्षात यायला सुरुवात झाल्याने अल्पसंख्यांकाचाही मोठा ओढा पक्षाकडे येत आहे,अशी माहितीही श्री.आर्लेकर यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून सदस्यता मोहिमेचा आढावा घेतला असता ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते,असेही श्री.आर्लेकर म्हणाले.जात, धर्म, भाषा, पंथ आदींच्या आधारावर सदस्यता नोंदणी करण्याच्या विरोधात हा पक्ष आहे,असेही स्पष्टीकरण श्री.आर्लेकर यांनी केले. भाजपच्या विचारधारेशी सहमती असलेले व या पक्षाबाबत आपुलकी व सहानुभूती असलेले लोक या पक्षाचे सदस्य बनण्यास इच्छुक असतात,असेही त्यांनी सांगितले.

No comments: