Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 10 July, 2009

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना आता पाचशे रुपये दंड

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)- दुचाकी घेऊन महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी वाहतूक नियम मोडल्यानंतर सहज शंभर रुपयाची नोट काढून दंड भरत असल्याने दंडाची रक्कम वाढवून किमान दंड पाचशे रुपये करण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी वरिष्ठांकडे केली आहे. दंडाची रक्कम शंभर वरून पाचशे करण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून सरकार दरबारी पडलेला असून पाचशे रुपयाची किंमत घसरण्यापूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास काही प्रमाणात बेदरकारपणे वाहन हाकणाऱ्या तरुणांवर वचक बसणार असल्याचे मत पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी व्यक्त केले. या विषयावर पत्रकारांनी छेडल्यावर ते बोलत होते.
सध्याच्या काळात शंभर रुपयांना कोणतेही महत्त्व राहिलेले नाही. महाविद्यालयात जाणारा विद्यार्थी सहजपणे शंभर रुपयाची नोट काढून दंडाची रक्कम भरतो. त्यामुळे त्यांना कायद्याची किंवा वाहतूक नियमांची कसलीही भिती वाटत नाही. ही रक्कम वाढवून किमान दंड पाचशे रुपये केल्यास काही प्रमाणात वाहतूक नियम पाळले जाणार असल्याचे मत यावेळी श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले. यापूर्वी किमान दंड ४० रुपये होता. ही रक्कम एकदमच नगण्य असल्याने ती वाढवून किमान शंभर रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारकडे करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर होईतोवर शंभर रुपयांची किंमत घसरली. त्यामुळे लवकरात लवकर दंडाची रक्कम वाढवली जावी, अशी मागणी पोलिस खात्याची आहे.
दंडाची रक्कम वाढवली आणि हेल्मेट परिधान केले म्हणून अपघात टळणार नाही. त्यासाठी वाहतूक नियमांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. जोपर्यंत वाहतूक नियमांचे पालन होत नाही, तोवर अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होणे कठीण आहे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे मद्यप्राशन करून वाहन हाकणाऱ्यांना थेट अटक करून न्यायालयात उभे करण्याची कार्यपद्धत वाहतूक पोलिसांनी अवलंबली पाहिजे, असेही मत श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

No comments: