Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 July, 2009

गांधी मार्केटातील दोन दुकाने आगीत खाक;५लाखांची हानी

मडगाव, दि.५ (प्रतिनिधी) - काल रात्री साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास गांधी मार्केटमधील दोन रेडीमेड कापड दुकानांना आग लागून ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली व साधारण एक लाखाची हानी झाली पण दुकानदारांच्या म्हणण्याप्रमाणे ५ लाखांची नुकसानी झाली आहे.
आग कशी लागली ते कळू शकले नाही पण शॉटसर्किट हेच त्यामागील कारण असावे असा कयास आहे. सदर दुकाने सिराज शेख व जाफर शेख यांच्या मालकीची आहेत . कोणाच्या तरी आग लागल्याचे लक्षात आले व त्यांनी अग्निशामक दलाला खबर दिल्यावर त्यांनी धाव घेऊन आग विझविली, त्यामुळे एकमेकांना भिडून असलेली अन्य दुकाने बचावली. सदर दुकानांतील सर्व माल खाक झाला.
दरम्यान, आज सकाळी साडे अकरा वाजता अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रावर पुन्हा गांधी मार्केटात आग लागल्याचा फोन आला व दलाचा बंब सायरन वाजवत तिकडे दाखल झाला. पण प्रत्यक्षात गांधी मार्केटात सर्व काही नेहमीप्रमाणे चालू होते व सर्वत्र तपास करूनही कुठेच आग लागली नसल्याचे आढळून आले त्यामुळे कोणीतरी विनाकारण दलाला धावपळ करायला लावल्याचे दिसून आले. नंतर मिळालेल्या माहितीनुसार मार्केट परिसरात कुणीतरी जुने कपडे व कचऱ्याला आग लावली होती पण ते भिजल्यामुळे आगीने पेट घेण्याऐवजी धूर बाहेर पडला व तो पाहून व काल रात्रीच्या आगीतून कोणीतरी वेळ न गमावता अग्निशामक दलाला ही वर्दी दिली.
गेल्या आठवड्यातील कुडचडे येथे दुकानाला लागलेली आग व कालचा कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील स्फोट यांच्या पार्श्र्वभूमीवर आज भर बाजाराकडे निघालेल्या अग्निशमन दलामुळे मडगावकरांच्या मनांत मात्र अभद्र शंकेची पाल चुकचुकली होती.
अग्निशामक दलाला गांधी मार्केटात पोचेपर्यंत मात्र नानाविध समस्यांचा सामना करावा लागला. रस्त्यावर वाटेल तशी उभी केलेली वाहने, त्यातच फेरीवाल्यांनी टाकलेल्या पथाऱ्या व त्यातून झालेला वाहतुकीचा खोळंबा यामुळे दलाच्या गाडीला तेथे पोचेपर्यंत नाकी नऊ आले.

No comments: