Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 July, 2009

पावसाने राज्यात अर्धशतक ओलांडले

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)- गेले तीन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसाने अखेर इंचांचे अर्धशतक ओलांडले आहे. आज दिवसभरात हवामान खात्याने केलेल्या नोंदीप्रमाणे साडेतीन इंच पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आजची सरासरी कमी असली तरी एकूण पाऊस ५१ इंचावर पोहचल्याने जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाने अर्धशतकी ओलांडली आहे.
आज दिवसभरात पावसाचा जोर कमी होता परंतु दिवसभर पावसाचे झिरपणे सुरूच होते, त्यामुळे अनेकांनी बाहेर पडणे टाळले. गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र भरलेले पाणी हळूहळू ओसरत चालल्याची माहिती विविध भागांतून मिळाली आहे. पणजी येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे आज केवळ १४ संदेशांची राज्यभरात नोंद झाली आहे. कालच्या ५२ संदेशांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी असल्याने खरोखरच पावसाचा जोर उतरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिचोलीत पावसामुळे निर्माण झालेला पुराचा धोका तूर्त टळला असून या भागात विविध ठिकाणी साचलेले पाणी कमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, विविध ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेल्याची खबर मिळाली आहे. वास्को येथील महामार्गाचा रस्ता पहिल्या पावसातच वाहून गेल्याने येथील लोक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित यासंबंधी दुरुस्ती काम युद्धपातळीवर हातात घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत असून अन्यथा पावसामुळे पडलेले रस्त्यावरील खड्डे अपघातांसाठी कारणीभूत ठरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

No comments: