Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 10 July, 2009

"सोसायटी'च्या कामगारांना कंत्राटावर घेण्याचा प्रस्ताव

गोमेकॉ सफाई कामगारांचे आंदोलन स्थगित

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारांना केवळ राजकीय वैमनस्यातून सतावले जात होते हे आता स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या सर्व कामगारांना सेवेत घेण्याचे सशर्त मान्य करून भाजप सरकारच्या कारकिर्दीत स्थापन झालेल्या गोवा रोजगार व कंत्राटी कामगार सोसायटीशी फारकत घेऊन थेट गोमेकॉ अंतर्गत कंत्राटावर भरती होण्याची अट घातली आहे. आपल्या भवितव्याबाबत चिंतीत बनलेल्या या सुमारे २०८ कामगारांनी ही अट मान्य करून गेल्या १० जूनपासून सुरू केलेले आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा रोजगार व कंत्राटी कामगार सोसायटीअंतर्गत गेली नऊ वर्षे गोवा वैद्यकीय महाविद्यालय, मानसोपचार केंद्र व टी. बी. इस्पितळात सफाई कामगार म्हणून सेवेत असलेल्या सुमारे २०८ कामगारांना सेवामुक्त करण्याचे षड्यंत्र विद्यमान सरकारने आखले होते.आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या सत्तरी तालुक्यातील लोकांची थेट भरती सुरू करून या कामगारांना घरी पाठवण्याची तयारी केल्याने या कामगारांनी गेल्या १० जूनपासून बेमुदत धरणे धरले होते. यापूर्वी या कामगारांना सेवेत नियमित करण्याचे आश्वासन दिलेल्या आरोग्यमंत्र्यांनी अचानक आपला शब्द फिरवल्याने या कामगारांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक गेल्या ६ जुलै रोजी पर्वरी मंत्रालयात पार पडली. या बैठकीला कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, सुहास नाईक, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ.राजनंदा देसाई, आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव, कार्मिक खात्याचे संयुक्त सचिव, प्रशासकीय खात्याचे संयुक्त सचिव, गोमेकॉचे प्रशासकीय संचालक व उपसंचालक, मानसोपचार केंद्राचे प्रशासकीय उपसंचालक आदी हजर होते.
या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी भाजप सरकारने तयार केलेल्या सोसायटीबाबत आपल्या मनातील गरळ ओकली. सोसायटीशी सरकारने संबंध तोडल्याचेही ते यावेळी म्हणाले. केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून या कामगारांना सेवेत ठेवल्याचे ते म्हणाले,अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या बैठकीत या कामगारांना पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीवर कामाला घेण्याचे चर्चेनंतर ठरले परंतु या कामगारांना थेट गोमेकॉ अंतर्गत कंत्राटावर भरती केले जाणार आहे व त्यासाठी त्यांना नव्याने मुलाखती द्याव्या लागतील,असेही ठरले.सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांना पगार देण्यात येणार आहे. चतुर्थश्रेणी कामगारांना मिळणाऱ्या सर्व रजाही त्यांना लागू करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. गोमेकॉत सफाई कामगारांच्या १८७ जागा रोजंदारीवर भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यताही मिळवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही भरतीप्रक्रीया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करून ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी त्यांना रुजू केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान,भविष्यात या २०८ कामगारांना वय, शिक्षण आदी अटी शिथिल करून सेवेत कायम करण्याबाबत निश्चित धोरण तयार केले जाणार असल्याची माहिती कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली. विकास आयुक्त तथा आरोग्य खात्याचे सचिव यांनी गेल्या २४ जून २००९ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे ही बैठक बोलावण्यात आली होती.या २०८ कामगारांना "एमआरआय'संस्थेकडे त्यांच्या सोयीप्रमाणे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. यावेळी ४ साहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्याचे ठरले.

No comments: