Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 August, 2010

वास्कोतील उपकारागृहातून पळालेल्या अभिजीत पाटील याला फिल्मी स्टाईलने पकडले

कुडचडे, दि. ७ : (प्रतिनिधी) : सडा वास्को येथील उपकारागृहातून ४ ऑगस्ट रोजी पहाटे पलायन केलेल्या तीन कैद्यांपैकी अभिजीत पाटील व सॅबी फर्नांडिस हे काले येथील रेल्वे रुळाजवळील मोडक्या घरात राहात असल्याची माहिती मिळताच शनिवारी पहाटे ४ च्या दरम्यान पोलिसांनी कॉबिंग ऑपरेशन करून घरावर छापा घालून अभिजित पाटील याला पकडले. मात्र त्याच्यासोबत असलेला सॅबी फर्नांडिस हा कैदी झाडेझुडपे व काळोखाचा फायदा घेऊन पळून जाण्यात सफल ठरला.
काले रेल्वे स्टेशनजवळील एका जुन्या घरात दोघे अनोळखी व संशयित व्यक्ती राहत असल्याची माहिती सूत्रांकडून रात्री १२.३० च्या सुमारास मिळताच पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांच्या मार्गदर्शनाखाली केप्याचे उपअधीक्षक उमेश गावकर, निरीक्षक भानुदास गावकर, संतोष देसाई, सिद्धांत शिरोडकर, सागर एकोस्कर, रवी देसाई, कपिल नाईक, सुदेश नार्वेकर इतर उपनिरीक्षकांनी पहाटे ४ च्या दरम्यान काले येथे झाडाझुडपातून वेढलेल्या त्या घराला खास कॉबिंग ऑपरेशन करून घेराव घातला. अनेक वर्षांपासून सदर घरात कोणीच राहात नसल्याने झाडांनी वेढलेल्या घरातून अभिजीत पाटील याला पोलिसांनी पकडले. यावेळी त्याच्यासोबत असलेला दुसरा कैदी सॅबी फर्नांडिस हा काळोख व घनदाट झुडपांचा फायदा घेत तेथून पळून गेला.
काले येथे भगवान महावीर अभयारण्य क्षेत्र नजीक असल्याने सॅबी हा जंगलात पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज दिवसभर या भागाची पोलिसांनी अनेकवेळा झडती घेऊनही त्याचा थांगपत्ता लागला नसल्याची माहिती निरीक्षक भानुदास गावकर यांनी दिली. पहाटे पलायन केलेल्या सॅबीला पकडण्यासाठी खास कॉबिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्याचा काहीही फायदा होऊ शकला नाही.
दरम्यान, अभिजीतला केपे उपजिल्हाधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांच्यापुढे हजर करण्यात आले व नंतर वास्को हार्बर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

No comments: