Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 14 August, 2010

श्रीराम हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक!

श्री हनुमत् शक्ती जागरण समितीतर्फे श्रीराम मंदिर अभियानाला सुरुवात
पणजी,दि. १३ (प्रतिनिधी): श्रीराम हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असून ६ डिसेंबर १९९२ साली अयोध्येत श्रीराम जन्मस्थळी कारसेवा केलेल्या ठिकाणी भव्य श्रीराम मंदिर उभारणे हा तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. या लोकभावनेच्या पूर्ततेसाठी श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी श्री हनुमत् शक्ती जागरण समिती पुढे सरसावली आहे, असे प्रतिपादन श्री हनुमत् शक्ती जागरण समितीचे राष्ट्रीय आयोजन सचिव प्रशांत हरताळकर (मुंबई) यांनी केले.
आज पणजी येथील सिद्धार्थ बांदोडकर भवनातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. हरताळकर बोलत होते. श्री हनुमत् शक्ती जागरण समिती गोमंतक, कोंकण प्रांतातर्फे आयोजित सदर पत्रकार परिषदेला समिती संयोजक राजेंद्र वेलिंगकर, उपाध्यक्ष ऍड. महेश बांदेकर व सह संयोजक आनंद शिरोडकर उपस्थित होते.
रामभक्तांनी कारसेवा केलेल्या जागीच राममंदिर होते हे भारतीय पुरातत्त्व खात्याने १९९५मध्ये के लेल्या भू- रडार सर्वेक्षणात सिद्ध झालेले आहे. जगातील समस्त हिंदूंच्या भावना, ऐतिहासिक दस्तावेज व पुरातत्त्व खात्याचे संशोधन या सर्वांमधून श्रीराम मंदिर जागेबाबत असलेली संदिग्धता दूर झाली असून, न्यायालयाचा निकालही हिंदूंच्याच बाजूने लागेल, असा विश्वास श्री. हरताळकर यांनी यावेळी व्यक्त केला. यंदा हरिद्वार येथे झालेल्या संतांच्या सभेत श्रीरामांच्या जन्मस्थळी भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला असून श्री हनुमत् शक्ती जागरण समितीतर्फे देशभर जागृती करून हा संकल्प पुरा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी समितीच्या गोव्यातील कार्याबाबत गोवा संयोजक राजेंद्र वेलिंगकर यांनी माहिती दिली. यापूर्वी राममंदिर आंदोलनाच्या वेळी गोमंतकीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. दि.१५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात समितीतर्फे गावागावांतील मंदिरांत ६३८ अनुष्ठान व "श्री हनुमान चालिसा'चे पठण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात तालुकावार महायज्ञ, बैठका, सभा, जनजागृती व हस्ताक्षर अभियान राबवण्यात येईल. हिंदूच्या ४५ ते ५० हजार सह्यांचे निवेदन"रामबाण प्रस्ताव' म्हणून राष्ट्रपतींना सादर केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले व गोमंतकीय जनतेने समितीच्या कार्यात सहभागी होऊन भव्य श्रीराम मंदिर उभारणीचे समस्त हिंदूंचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे आवाहन केले. हे कार्य तडीस नेण्यास प्रसिद्धी माध्यमांनीही समितीला सहकार्य करावे असे ते म्हणाले.
श्री हनुमत् शक्ती जागरण समितीचे हे कार्य "श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण हेतू श्री हनुमत् शक्ती जागरण अनुष्ठान' या नावाने पुढे नेण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

No comments: