Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 August, 2010

बाजीरावांचा अप्रस्तुत उल्लेख

पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात (पृ ४५ ते ६२) जेम्सने खास करून १७८० ते १८१० हा कालखंड दिला आहे. त्याने इतर संदर्भ साहित्याबरोबर महिपती बुवांच्या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या संबंधी गोेष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केला असून त्यातून रंगविलेली शिवाजी महाराजांची प्रतिमा ही एका वीर पुरूषाच्या भूमिकेतून धार्मिक राजाच्या प्रतिमेत कशी बदलली गेली याचे विश्लेषण करण्याचा आव आणला आहे.
थोरल्या बाजीरावांच्या संदर्भात वा.गो. गोखले यांनी केलेल्या वर्णनानंतर जेम्स लेनने दिलेला त्या बाबतचा शेरा त्याची मनोवृत्ती दाखवितो." Few Maharashtrians today know the details of Bajirao's illustrous militory career and his role in transforing Pune from a market town into a grand city, but most would know of his illegitimate afair with the muslim dancing girl Mastani ( पृ ४७)
बरोबर आहे. हा मनुष्यस्वभाव आहे. दुसऱ्याची प्रकरणे चघळणे ही प्रवृत्ती सर्वच समाजात असते. जेम्स लेनच्या अमेरिकेतही ते चालते. जॉन एफ. केनेडीनी क्युबा संबंधात झालेल्या संघर्षाची अमेरिकन नागरिकांना विशेष माहिती नसते. मात्र त्यांनी मेरिलीन मन्रोबरोबर केलेल्या लफड्याची नेमकी माहिती असते. जॉन केनेडीसाठी सुंदर मुलीची ने आण करण्यासाठी लष्करातील विमान वापरताना किती खर्च झाला यावरील पुस्तके तिथे हातोहात खपतात. बिल क्लिंटनने त्याच्या कारकिर्दीत ज्या आर्थिक धोरणांना राबविले ती धोरणे तर विस्मृतीत गेली आहेत. बिल क्लिंटन म्हणताच मोनिका लेविन्स्किची आठवण अमेरिकेतील लोकांनाच नव्हे तर अमेरिका बाहेरच्या लोकांनाही आपसुकच होते.
वरील प्रकारचा शेरा देण्यात लेनने काय मोठी इतिहास मिमांसा केली ते कळण्यास मार्ग नाही. जाताजाता बाजीराव मस्तानीचे अप्रस्तुत प्रकरण चघळण्याचा मोह त्याला टाळता आला नाही हे नक्की.
अठराव्या शतकातील शिवछत्रपतीवरील लिखाणाचा उल्लेख करताना लेनने सभासदबरबरीच्या रघुनाथ यादवाने केलेल्या पुनर्लिखाणाबरोबरच चित्रगुप्त आणि चिटणीसवखरींचा उल्लेख आहे.
शतकभरात शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विस्तार होऊ लागला आणि अनेक आख्यायिका त्यात जोडल्या गेल्या. त्यात हिन्दुत्वाची जोड दिली गेली असे लेन म्हणतो.Even if we restrict ourselves to the tales known in Shivaji's own times we see traces of a religious hero fighting a religious war and these trace are elaborated in the eighteenth centary to articulate the Hindu dimension of Shivaji's legendary identity. (पृ. ४९)
एकीकडे समजातील किंबहूना हिन्दु-मुस्लिम संबंधामधील गुंतागुतीचा त्याच पानावर उल्लेख करणारा लेन (पृ ४९) स्वत: मात्र ठोकळेबाज आणि भोळसटपणाची विधाने कशी करतो ते वर दिलेल्या अवतरणावरून दिसते आहे. त्याला शिवाजी महाराज हे एका जाहागिरदारदाचे पुत्र केवळ स्वतंत्र राज्य स्थापन करणारे झाले. त्यामागे देश, धर्म इत्यादीची काही प्रेरणा नव्हती हे सिद्ध करायचे आहे असाच सूर ४०-५० वर्षापूर्वी हिन्दू शब्दांचेच वावडे असलेल्या साम्यवादी विचारवंतांनी (?) लावला होता. त्याची येथे आठवण होते. हिन्दूचे स्वराज्य जे मुसल्यान राज्यकर्त्यांपासून स्वतंत्र असेल जेथे हिन्दूंना कुठल्याही छळावळाशिवाय, भिती शिवाय सुखेनैव राहता येईल. तसेच जेथे इतर धार्मियांनाही त्यांच्या धर्माचे पालन करून स्वदेशप्रीती मनात जागृत ठेवून राहता येईल. अशा राज्याची स्थापना महाराजांना अगदी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासून अभिप्रेत होती. (क्रमशः)

No comments: