Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 August, 2010

मागण्या पूर्ण न झाल्यास २७ रोजी उपोषणाचा इशारा

आरोग्यसेवेविषयी काणकोणवासीय आक्रमक

काणकोण, दि. ८ (प्रतिनिधी)- काणकोण सामाजिक इस्पितळासंबंधीच्या प्रमुख मागण्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध २७ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने काणकोणवासीय उपोषणाला बसतील, असा इशारा आज काणकोण आरोग्य कल्याण समिती व आरोग्यासंबंधी जागरूक काणकोणच्या नागरिकांनी चावडी - काणकोण येथे दिला.
यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश तवडकर, आरोग्य कल्याण समिती अध्यक्ष डायगो डिसिल्वा, ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा बी. देसाई, संजय कोमरपंत आदी उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानांवरून बोलताना रमेश तवडकर म्हणाले, की २८ जून रोजी "काणकोण बंद' हा राजकारणविरहित कार्यक्रम होता. जनतेच्या एका मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व जनतेच्या भावना निद्रिस्त सरकारच्या कानी पोहोचविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकमुखी घेतलेला तो निर्णय होता. मात्र २७ तारखेला सरकारतर्फे व अन्य काहींनी आंदोलन चिरडण्यासाठी डाव रचला. काही लोकप्रतिनिधींनी यावेळी सरकारकडून आश्वासने प्राप्त करून घेतली. त्यावेळीही आम्ही अशा आश्वासनांवर विश्वास नसल्याचे सांगून आंदोलन यशस्वीच केले. आज सरकारकडून आश्वासने पाळली गेली नसल्याने आम्ही त्याचा निषेध करत आहोेत. आज समितीच्या प्रयत्नामुळे तथा संघर्षामुळेच थोड्याफार सुविधा उपलब्ध आहेत. परंतु पूर्ण दर्जात्मक इस्पितळाची मागणी करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असे तवडकर शेवटी म्हणाले.
इस्पितळातील ट्रोमा युनिट सुरू केलेले नाही, रुग्णवाहिका सेवा नाही, पुरेशी डॉक्टरसेवा नाही. फक्त चार डॉक्टर्सवर जास्त ताण येत असून रुग्णांना संध्याकाळपर्यंत थांबावे लागत आहे. गेल्या मुक्तीनंतरच्या ५० वर्षात काणकोणकरांना आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा व कला या सुविधा पुरविण्यात सरकार पूर्ण अपयशी ठरले असून सगळेच काणकोणवासी खाजगी इलाज करू शकत नसल्याचे समिती अध्यक्ष डिसिल्वा म्हणाले.
या सरकारविरुद्ध जनहित याचिका दाखल का करू नये,असा सवाल यावेळी करण्यात आला. खाजगी डॉक्टरांचा गल्ला वाढविण्यासाठी मंत्र्यांना हाताशी धरून हा खेळ खेळण्यात येण्याची शक्यता काही वक्त्यांनी व्यक्त केली. काणकोणचे पंचायत ते विधानसभेपर्यंतचे लोकप्रतिनिधी काणकोणच्या नागरिकांच्या आरोग्यासंबंधी सोयरसुतक नसल्याप्रमाणे वागत असल्याचे व अशांना येत्या निवडणुकीत जनताच घरचा रस्ता दाखविल, असा सूर वक्त्यांनी व्यक्त केला.
आरोग्यमंत्री विदेश दौऱ्यात मग्न असून त्यांचे काणकोणकडे अजिबात लक्ष नाही, ३०० दिवस ते गोव्याबाहेर राहत असल्याने जर काणकोणकरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असाल तर करमलघाटाखाली त्यांना प्रवेशही बंद जनता करेल असे कृष्णा बी. देसाई म्हणाले. तत्पूर्वी समिती सचिव संजय कोमरपंत यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी संपूर्ण महिनाभराच्या घटनेचा उल्लेख त्यांनी केला.
यावेळी वालेरियान व्हिएगस, आगोंदचे गोईश, ओनाराद फनार्ंंडिस, राणे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
शेवटी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर सचिव संजय कोमरपंत यांनी आभार व्यक्त केले.
आज घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय
१. काणकोण सामाजिक इस्पितळाचा दर्जा वाढवावा, २. आवश्यक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती १५ ऑगस्ट पूर्वी करावी, ३. औषधालयात उचित मात्रेत औषधे पुरवावी, ४.ट्रोमा युनिट सुरू करावे, ५. किडणी युनिटमध्ये सुरळीतपणा आणावा. अन्यथा २७ रोजी उपोषण सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
तत्पूर्वी १३ ऑगस्ट रोजी इस्पितळाला सकाळी ११ वाजता समिती भेट देईल. १४ रोजी पहिली आढावा बैठक होईल. अंतिम आढावा बैठक २३ ऑगस्ट रोजी घेतली जाईल व सरकारने दुर्लक्ष केल्यास यावेळी पूर्ण ताकदीनिशी आंदोलनात उतरू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

No comments: