Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 August, 2010

उपेंद्र गावकर यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - पर्वरी येथील हॉटेल मॅजेस्टिक व्यवस्थापनाकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना राज्य प्रमुख उपेंद्र गावकर यांच्यासह उमेश साळगावकर याच्यावर पर्वरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या विषयीची पोलिस तक्रार हॉटेल मॅजेस्टिकचे व्यावसायिक सल्लागार श्रीनिवास नाईक यांनी केली आहे. हॉटेल बेकायदा असल्याने व येथे कॅसिनो चालत असल्याने त्याच्याविरुद्ध आवाज न उठवण्यासाठी ही खंडणी मागण्यात येत होती, असे श्री. नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तक्रारीवरून उमेश साळगावकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहितीनुसार, दि. ४ ऑगस्ट २०१० रोजी उमेश साळगावकर हा हॉटेलमध्ये आला होता. यावेळी त्याने आपण शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून आपला मोबाईल क्रमांक स्वागत कक्षात ठेवला होता. तसेच हॉटेलच्या व्यवस्थापकाला आपल्याला मोबाईलवर संपर्क साधण्यासही सांगितले होते. यावेळी कॅसिनोच्या व्यवस्थापकाने दि. ८ रोजी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने त्याच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मोर्चा आणून आंदोलन छेडले जाणार असल्याचाही इशारा देण्यात आला होता, अशी माहिती श्री. नाईक यांनी पोलिसांना दिली. २५ लाख रुपये देणे शक्य नसल्याने वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा १५ लाख देण्यास सांगितले गेले. तेही शक्य नसल्याने ३ लाख रुपये देण्याचे ठरले.
या ३ लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील ५० हजार रुपये नेण्यासाठी आज सायंकाळी उमेश याला बोलावण्यात आले होते. तो संध्याकाळी ५ वाजता सदर हॉटेलमध्ये आला. यावेळी त्याने मोबाईलवर संपर्क साधून उपेंद्र गावकर यांनाही बोलावून घेतले. हे पन्नास हजार रुपये उपेंद्र गावकर यांनी स्वीकारले असून ते "पार्टी फंड'साठी मागितले जात आहेत, असे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या विषयीचा अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड करीत आहेत.

No comments: