Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 10 August, 2010

नेसाय येथे भरदिवसा घरफोडी सुमारे १० लाखांचा ऐवज पळविला

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): सासष्टीतील ग्रामीण भागांत या दिवसांत दिवसाढवळ्या घरे फोडून चोऱ्या करण्याचे प्रकार बरेच वाढलेले असून आज सकाळी नेसाय - इगर्जीवाडा येथील एक घर फोडून चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचा ऐवज पळविला. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्र्वानपथकाला आणून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण सायंकाळपर्यंत त्यांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नव्हते.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅटरीना डिकॉस्ता यांनी मायणा - कुडतरी पोलिसांत तक्रार नोंदविलेली असून सकाळी ९ ते १०.३० दरम्यान ही घटना घडल्याचे म्हटले आहे. त्या घर बंद करून बकऱ्यांना घेऊन बाहेर गेल्या होत्या. तासाभराने परत आल्या तेव्हा घराचा दर्शनी दरवाजा फोडला गेल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. आत जाऊन पाहता चोरट्यांनी आतील कपाट फोडून दागिने व अन्य किमती वस्तू पळविल्याचे आढळून आले. त्यात २ मंगळसूत्रे, १६ बांगड्या, ४ ब्रेसलेट, १० अंगठ्या, ३ हार, ६ साखळ्या व ९ कर्णफुले यांचा समावेश होता. विदेशात असलेल्या कॅटरीना हिच्या बहिणीने आपले दागिने तिच्याकडे ठेवले होते. नेमके तेच पळवले गेले आहेत
लगेच त्यांनी मायणा - कुडतरी पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला; तसेच श्र्वानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलावून काही सुगावा लागतो का ते पाहिले. परंतु, चोरांचा कोणताच थांगपत्ता लागू शकला नाही. कुत्री घराच्या परिसरात घुटमळली व रेल्वेमार्गापर्यंत जाऊन परत फिरली. त्यामुळे कोणी तरी माहितगारानेच पाळत ठेवून हे काम केले असावे, असा तर्क लावला जात आहे. अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, सासष्टीतील ग्रामीण भागांत अशा प्रकारच्या चोऱ्यांचे सत्रच सुरू झाले असून त्यामागे एखादी टोळी कार्यरत आहे की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्यात फातोर्डा येथे भर वस्तीतील मदेरा एन्क्लेव्ह इमारतीतील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी साधारण १.३६ लाखांचा ऐवज लंपास केला होता. फातिमा सेक्राफेमेलिया ही महिला आपल्या मुलीला घेऊन आर्लेम येथे राहणाऱ्या आईकडे गेली होती व दुपारी परतल्यावर तिला चोरीचा प्रकार कळून चुकला होता.
त्यापूर्वी २९ जुलै रोजी चांदर येथे अशाच प्रकारे दिवसाढवळ्या घर फोडून रोकड व दागिने मिळून लाखोंचा ऐवज पळविला गेला होता. सदर प्रकरणीही एका महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर पडली तिच्यानंतर घरी असलेला तिचा सासराही घर बंद करून बाहेर पडला व काही वेळाने परतला असता चोरीचा प्रकार उघडकीस आला होता.

No comments: