पर्यावरणाकडे राज्यकर्त्यांचे सपशेल दुर्लक्ष : डॉ. सुभाष भेंडे
पणजी, दि. ११ (सांस्कृतिक प्रतिनिधी)ः खाण व्यवसायामुळे गोव्याचा काही प्रमाणात विकास झाला तरी त्यासाठी गोव्याला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. येथील पर्यावरणाचे तीनतेरा वाजले आणि आजही तोच प्रकार सुरू आहे. एका बाजूने गोव्याची भरभराट होत आहे, तर दुसऱ्या बाजूने पर्यावरणाचा नाश होत आहे. आजचे राज्यकर्ते राज्याचा विकास करताना या महत्त्वाच्या मुद्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने भविष्यात गोमंतकीयांना भयानक परिणामांना सामोरे जावे लागणार आहे, असा जळजळीत इशारा
अर्थतज्ज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांनी दिला.
हा तथाकथित विकास कालांतराने विघातक ठरेल अशा गोष्टींना वेळीच आवर घालणे काळाची गरज आहे. त्याकरता राज्यकर्त्यांनी वेळीच या मुद्याकडे लक्ष दिले नाही तर
गोवेकरांवर विपरीत परिणामांना सामोरे जाण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत डॉ. भेंडे यांनी खंत व्यक्त केली.
अखिल गोवा भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी समारोह समितीने गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजिलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत समितीचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, कार्याध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट, सचिव धर्मा चोडणकर, उपाध्यक्ष अनुप प्रियोळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
आज मुंबईसारख्या ठिकाणी जी स्थिती आहे तशीच गोव्याची अवस्था व्हायला फार वेळ लागणार नाही. कारण विविध कामांच्या निमित्ताने गोव्यात येणारे परप्रांतीय येथेच ठिय्या मारत आहेत. तसेच गोव्याच्या समुद्र ठिकाणी स्वतःचे घर असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्याने धनाढ्य परप्रांतीय गोव्यात मोठ्या प्रमाणावर जमिनी घेऊन मोठमोठ्या इमारतींचे जाळेच उभारत चालले आहेत. गोव्यातील प्रमुख शहरातील जास्तीत जास्त व्यवसाय हे परप्रांतीय चालवत असल्याचे चित्र मेाठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे कालांतराने गोव्यात गोमंतकीय किती प्रमाणात राहणार ही विचार करण्याची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
आज जगाच्या नकाशावर गोव्याचे विपर्यस्त चित्र रेखाटले जात आहे. केवळ वर्तमानच नव्हे तर गोव्याच्या इतिहासाविषयीही चुकीची माहिती दिली जात आहे. कारण संपूर्ण गोव्यावर पोर्तुगीजांनी ४५० वर्षे राज्य केल्याचे सांगितले जाते; परंतु पोर्तुगीजांनी गोव्याच्या काही भागावरच ४५० वर्षे राज्य केले आणि काही भागावर २०० वर्षे राज्य केले. त्याचे पुरावेही उपलब्ध असल्याची माहिती डॉ. भेंडे यांनी दिली.
सध्याचे स्वार्थाने बरबटलेले राजकारण आणि भाऊंचे राजकारण यात जमीन - आसमानाचा फरक दिसून येतो. भाऊंच्या १७ वर्षांच्या संपन्न काळात गोमंतकाने २ मुख्यमंत्री पाहिले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नंतरच्या केवळ २० वर्षांत १७ मुख्यमंत्री गोमंतकीयांच्या नशिबी आले. आज राजकारणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यकर्ते केवळ खुर्ची उबवण्यात मग्न आहेत. खरी सूत्रे भलतीच मंडळी हलवत आहेत.
ते म्हणाले, आज आम आदमीच्या विकासासंदर्भात फक्त फुकाच्या वल्गना केल्या जातात. तथापि, उपेक्षितांविषयी कणव आणि दानशूरपणा भाऊंमध्ये पूर्वीपासून होता. देशाचे पहिलेे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या विश्वासाला दणका देणारे आणि कॉंग्रेस पक्षाचे पानिपत करून विमुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनलेल्या भाऊसाहेबांनी गोव्यात शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा पाया घातला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच गोव्यात आजही शिक्षणाची गंगा वाहताना दिसते आहे. असे मुख्यमंत्री आणखी दहा वर्षे गोव्याला लाभले असते तर गोव्याचे चित्र वेगळेच दिसले असते.
प्रा. सिरसाट यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. ते म्हणाले, भाऊंचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे या हेतूने गोव्यात विविध ठिकाणी अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
याप्रसंगी रश्मी हळर्णकर प्रथम, रेणुका रेडकर द्वितीय, समीता तांबोसकर तृतीय, प्रीती शेट्ये आणि दक्षा सावंत (उत्तेजनार्थ) या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाली. डी.एड.च्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी डॉ. भेंडे यांची ओळख करून दिली. ऍड. खलप यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेबांबरोबर कायम असणारे बाळकृष्ण शिवा आंगले यांचा शाल, श्रीफळ आणि भाऊंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. धर्मा चोडणकर यांनी आभार मानले.
Thursday, 12 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment