Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 13 August, 2010

मोरजी येथे होडी उलटली काका बेपत्ता, पुतण्या सुखरूप

पेडणे, दि. १२ (प्रतिनिधी) - शापोरा नदीच्या पात्रात आज (दि. १२) पहाटे होडी घेऊन मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तेंबवाडा - मोरजी येथील मोहन अंकुश मोरजे (४५) व अंकुश मोरजे (२५) या काका - पुतण्याची होडी उलटली असता मोहन मोरजे समुद्रात खेचले जाऊन बेपत्ता झाले तर तर अंकुश याने पोहून किनारा गाठत आपला जीव वाचवला.
सविस्तर माहितीनुसार, आज पहाटे ५.३० वा. पावसाळ्यानंतर प्रथमच मोहन मोरजे व त्यांचा पुतण्या अंकुश मोरजे हे होडी घेऊन मासेमारी करण्यासाठी शापोरा नदीच्या पात्रात उतरले होते. ज्या ठिकाणी शापोरा नदी अरबी समुद्राला तेंबवाडा येथे मिळते त्या ठिकाणी त्यांची होडी पोहोचली असता आलेल्या प्रचंड लाटेने ती उलटली. पाण्यात फेकल्या गेलेल्या काका - पुतण्याने किमान १० मिनिटे उलटलेल्या होडीला पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जोराने आरडाओरडही केली. परंतु, आजूबाजूला कुणीही नसल्याने त्यांचा आवाज कुणाला ऐकू आला नाही. समुद्र खवळलेला असल्याने जोरदार लाटा उठत होत्या. त्यामुळे काका - पुतण्याची होडीवरील पकड सुटली. गटांगळ्या खाणाऱ्या काकाला आधार देण्यासाठी अंकुशने त्यांचा हातही पकडला. मात्र एका मोठ्या लाटेच्या तडाख्याने तो सुटला. त्यामुळे मोहन मोरजे अरबी समुद्राच्या जोरदार प्रवाहात वाहवत गेले. मात्र अंकुश याने मोठ्या मुश्किलीने पोहून सुखरूपपणे किनारा गाठला.
दरम्यान, उलटलेली होडी विठ्ठलदासवाडा येथे वाहवत गेली. समुद्र खवळलेला असल्याने तिला किनाऱ्यावर आणण्यासाठी जीव रक्षकांना पाच तास झुंज द्यावी लागली. यात जीवरक्षक अमित शिंदे, पराग कांबळी व अन्य दोघांनी विशेष कामगिरी बजावली.
दरम्यान, मोहन मोरजे यांचा शोध घेण्यासाठी जीवरक्षकांचे संध्याकाळी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात आली. मात्र अद्याप त्यांचा थांगपत्ता लागू शकला नव्हता.
या घटनेमुळे तेंबवाडा परिसरातच नव्हे तर मोरजी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहन मोरजे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित होते. मासेमारी करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. घरातील कर्ता पुरुष नाहीसा झाल्याने पत्नी मोहिनी मोरजे व एकुलती मुलगी मीनल (१७) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No comments: