Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 August, 2010

आता "पीएचडी'साठी प्रवेश परीक्षा सक्तीची

कौन्सिलच्या मान्यतेनंतरच क्रीडा धोरण लागू होणार

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्रेडिट पद्धत


पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - गोवा विद्यापीठात "पीएचडी'साठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना आता दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती आज गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. दिलीप देवबागकर यांनी दिली. गोवा विद्यापीठाने येत्या २०११ वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला "क्रेडिट' पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व महाविद्यालयांना व विद्यापीठासाठीही ऍकॅडेमिक कौन्सिलच्या मान्यतेनंतरच क्रीडा धोरण लागू केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
विद्यापीठातील विभागप्रमुखांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते विद्यापीठाच्या सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर कुलसचिव डॉ. एम. एस. सांगोडकर, प्रो. के. एस. भट. प्रो. पी. व्ही. देसाई व प्रो. जे. ए. ई. डीसा उपस्थित होते.
"पीएचडी' उमेदवारांसाठी आता प्रवेश परीक्षा सक्तीची केली आहे. या परीक्षेला शंभर गुणांचे दोन पेपर असतील. "नेट' परीक्षेप्रमाणेच या परीक्षेचा दर्जा असणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्याच उमेदवारालाच थेट मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. ज्या उमेदवाराने "नेट' परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्याला ही प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असणार नाही, असे प्रो. पी. व्ही. देसाई यांनी यावेळी सांगितले.
या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे. तसेच, ही परीक्षा "ऑनलाईन' पद्धतीने घेतली जाणार आहे. "पीएचडी'च्या उमेदवारांना किमान दोन प्रबंध सादर करावे लागणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे प्रबंध विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पाठवले जाणार असून ते आयोगाद्वारे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याचीही माहिती यावेळी प्रो. देसाई यांनी दिली.
"यूजीसी'च्या सूचनेनुसार विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी "क्रेडिट' पद्धत सुरू केली जात आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. अभ्यासक्रमांच्या दोन्ही वर्षाला मिळून विद्यार्थ्यांना किमान ८० क्रेडिट गुण मिळवावे लागणार आहेत. कोणत्याही विषयात कमी गुण प्राप्त झाल्यास अंतिम परीक्षेच्या आधी त्या विषयाची पुन्हा परीक्षा विद्यार्थी देऊ शकतो, अशी माहिती प्रो. देवबागकर यांनी यावेळी दिली. तसेच विज्ञान, कला, वाणिज्य वा अन्य कोणत्याही शाखेचे विद्यार्थी आपल्या आवडीचे विषय घेऊ शकतील. म्हणजेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना एखादा संगीताचा विषयही घेण्याची मुभा असणार आहे, असे प्रो. देवबागकर यांनी सांगितले.
गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून हॉटेल व्यवस्थापन व पर्यटन या दोन विषयांसाठी "एमबीए' अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तसेच, भूविज्ञान व मनुष्यबळ विकास हा पदविका अभ्यासक्रमही सुरू होणार आहे. त्याच्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पदविका अभ्यासक्रम हा बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
गोवा विद्यापीठाला पाच वर्षासाठी मिळणाऱ्या निधीत प्रचंड वाढ करण्यात आली असून यावर्षी १५ कोटी रुपये "यूजीसी'द्वारे देण्यात आले आहेत. सुरुवातीला ही रक्कम केवळ ३.४ कोटी अशी देण्यात आली होती. या निधीद्वारे विद्यार्थिनींसाठी सुसज्ज असे वसतिगृह, नवीन विभागाची तसेच प्रयोगशाळेची बांधणी केली जाणार असल्याचे प्रो. देवबागकर यांनी सांगितले.

गोवा संगीत महाविद्यालयाला गोवा विद्यापीठाच्या विभागाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यांत त्याला यश येईल,असे गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. दिलीप देवबागकर यांनी सांगितले. कला महाविद्यालयासाठीही अशाच प्रकारचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, एआयसीटी यांच्या मान्यतेनुसार महाविद्यालये सुरू असून त्यांची परवानगी घेतल्याविना या महाविद्यालयांना विद्यापीठ क्रीडा धोरण लागू करू शकत नाही. त्यामुळे या विषयी अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली असून अहवाल येताच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तो अहवाल ऍकॅडेमिक कौन्सिलसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतर कुलगुरूंची मान्यता मिळवली जाणार आहे व तेव्हाच राज्य सरकारचे क्रीडा धोरण लागू करणे शक्य होणार असल्याचे प्रो. देवबागकर यांनी आज स्पष्ट केले.

No comments: