Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 August, 2010

ड्रगप्रकरण सीबीआयकडे द्याच

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रथमच जाहीर मागणी

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - पोलिस आणि ड्रग माफिया साटेलोटे प्रकरण हे साधे नसून ते "पोलिस आणि दहशतवादी' संबंध असल्यासारखेच आहे. सरकारने त्याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. कारण ड्रग व्यवसायातून येणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्वरित या प्रकरणात हस्तक्षेप करून त्याचे तपासकाम केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) किंवा अन्य राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.
कॉंग्रेस आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज प्रथमच जाहीररीत्या अशा प्रकारची मागणी केली. पक्षाचे प्रवक्ते ट्रोझन डिमेलो यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गृहमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत राजकीय व्यक्ती ड्रग माफियांकडून "हप्ता' घेतात अशा स्वरूपाचा केलेला आरोप आहा भयंकर असून हप्ता घेणाऱ्या राजकीय व्यक्ती कोण याचीही चौकशी केली जावी. पोलिसांनी जप्त केलेले अमलीपदार्थ कडक पोलिस पहाऱ्यातून गायब होत असतील तर, पोलिसांच्या शस्त्रागराचीही तपासणी केली जावी.
यावेळी डिमेलो यांच्याबरोबर राजन घाटे व अन्य सदस्य उपस्थित होते. आम्ही केल्या मागण्यावर समाधानकारक कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे एक पथक मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच, या मागणीविषयी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याही चर्चाही झाली असल्याचे डिमेलो यांनी यावेळी सांगितले.
विधानसभेत हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यासाठी विरोधकांचा जोरदार हल्लाबोल सुरू असताना या विषयावर "ब्र'सुद्धा न काढणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री व आमदार आता विधानसभेबाहेर कॉंग्रेस सरकारला तोंडघशी पाडण्यासाठी रणनीती आखत आहेत. काल सकाळी पक्षाच्या कार्यकारिणीची झालेल्या बैठकीत याबाबतची व्यूहरचना निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
संघटनात्मक काम करण्यासाठीही या मुद्याचा हा पक्ष लाभ उठवणार असल्याचे समजते.
येत्या १५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबरदरम्यान पक्षातर्फे सदस्यता नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती डिमेलो यांनी दिली. यात मंत्री जुझे फिलिप आणि पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर भाग घेणार आहेत. राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना ड्रग माफियांकडून हप्ता घेण्यासाठी कोणी भाग पाडले, या प्रकरणात सहा पोलिस निलंबित झाले आहेत, जमा झालेला हप्ता कोणाकोणाला मिळत होता,. निलंबित पोलिस अधिकाऱ्यांना आणि पोलिस शिपायांना वशिल्याने अमलीपदार्थ विरोधी पथकात पाठवले होते का, याचीही कसून चौकशी केली जावी, अशा मागण्या डिमेलो यांनी केल्या.

1 comment:

vishwas said...

When the concerned politicians kept their mouths shut during the Assembly Session why are raising this issue now ? Is it to fool the people or to get something in bargain?