Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 August, 2010

बेपत्ता ५०० जणांचा शोध घेणे सुरूच

चोगलुमसर(लेह), दि. ८ - ढगफुटीनंतर आलेल्या पुरात ५०० वर लोक लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्याचे काम मदत पथकातील लोक मातीचे ढिगारे तसेच चिखल तुडवून करीत आहेत. शुक्रवारी आलेल्या ढगफुटीने अनेक खेडी नेस्तनाबूत केली आहेत तसेच वीज व दूरसंचार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आहे. दरम्यान, आज काही प्रेते आढळून आल्याने मृतांचा आकडा १४५ झाला आहे. मृतांत दोन फ्रान्सच्या नागरिकांचा समावेश असून त्यांची ओळख पटली आहे.
कधीकाळी आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा भाग आता नैसर्गिक आपदाग्रस्त भाग बनला आहे. येथे जिकडे बघाल तिकडे तुम्हाला निसर्गाने केलेला विनाशच दिसून येईल. अनेक वाहने चिखलात रुतून बसलेली दिसून येतात तर अनेक घरांत चिखल भरलेला आहे. गुडघा भर चिखलातून मार्ग काढत मदत पथकातील लोक मृतकांचा शोध घेत आहेत. चोगलुमसर खेड्याचे चित्र तर फारच भयाण आहे. येथे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस(आयटीबीपी), लष्क री जवान व जनरल रिझर्व्ह इंजीनिअर्स फोर्सचे लोक क्रेन व इतर मशिनरीच्या साह्याने काम करीत आहेत.
मृतांचा आकडा १४५ झाला असून बेपत्ता लोकांचा आकडा ५०० सांगितला जात आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्यांवर आयटीबीपी व लष्कराने स्थापन केलेल्या शिबिरांत उपचार सुरू आहेत. आयटीबीपीने काही जागी स्वयंपाकगृहे स्थापन केली असून येथे बेघरांना भोजन दिले जात आहे. या नैसर्गिक दुर्घटनेत बीएसएनलची संपूर्ण दूरसंचार यंत्रणा कोलमडून पडली असून ती पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे. दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित झाली तर बरेच कार्य सुकर होईल.

No comments: