Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 August, 2010

अस्नोड्यात भीषण अपघात


ट्रक चालक गंभीर, २०पेक्षा अधिक प्रवासी जखमी


म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी) - अस्नोडा येथील सेंट क्लारा हायस्कूलजवळ आज संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान मिनी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीत ट्रकच्या चालकासह मिनी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून ट्रक चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीए - ०४ - टी - २४१५ ही कपिला नामक मिनी बस म्हापशाहून वाळपईला जात होती तर एमएच - १४ - एएच - ९४३३ हा मालवाहू ट्रक अस्नोडामार्गे म्हापशाच्या दिशेने येत होता. अस्नोडा येथील सेंट क्लारा हायस्कूलजवळील वळणावर (बांयकडे) मिनी बसने उलट्या दिशेला जाऊन ट्रकला समोरासमोर धडक दिली. त्यामुळे ही दोन्ही वाहने चिन्ना कुट्टी मॅथ्यू यांच्या घराच्या संरक्षक कठड्याला जाऊन आदळली. या अपघातात मिनी बसचा चालक अशोक सुरेश गावकर (वय ४२. रा. ठाणे- सत्तरी) याच्या डोक्याला व हाताला बरीच दुखापत झाली तर बसची धडक थेट ट्रकच्या केबिनलाच बसल्याने ट्रक चालक विजय मंडारे केबिनमध्येच अडकून पडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी केबिनचा पत्रा कापून त्याला बाहेर काढला. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर तेथून जाणाऱ्या लोकांनी ताबडतोब मदतकार्याला सुरुवात करून बसमध्ये अडकून पडलेल्या अनेक जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यांनीच पोलिसांना पाचारण केले. काही प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेतून तर काहींनी आपल्या खाजगी वाहनांतून जखमींना उपचारांसाठी आझिलो इस्पितळात दाखल केले. या अपघातात वीसपेक्षा अधिक प्रवाशांना इजा झाली असून काहींना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले. सहा प्रवासी बांबोळी येथील गोमेकॉत तर चार प्रवासी आझिलो इस्पितळात उपचार घेत आहेत.
उपचार घेत असलेले प्रवासी ः ट्रक चालक विजय मंडारे, आयेशा पटेल, शनम पटेल, तेजस्विनी हिरेमठ (डिचोली), जीझस जोजफ चाको (अस्नोडा), आनंद देऊस्कर (पर्रा) हे बांबोळी येथे उपचार घेत आहेत; तर सुरत चोडणकर, सालू पेडणेकर (अस्नोडा), पुरन दरेवाल (होंडा), सागर गिमोणकर (पिळगाव) यांच्यावर आझिलोत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मिनी बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करत आहेत.

खाजगी बसवाल्यांची मनमानी रोखा
दरम्यान, या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सदर अपघाताचे स्वरूप अतिशय भीषण असेच होते. संरक्षक कठडा नसता तर सदर वाहने थेट मॅथ्यू यांच्या घरालाच धडकली असती व त्यामुळे जीवितहानी होण्याचाही संभव होता असे काहींनी सांगितले. या अपघातात सुसाट वेगाने जाणाऱ्या बस चालकाचीच चूक असल्याची प्रतिक्रियाही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. या मार्गांवरून जाणाऱ्या प्रवासी बसेसमध्ये विलक्षण चढाओढ सुरू असते व त्यामुळे या अरुंद व वळणदार रस्त्यावर तुरळक अपघात होतच असतात. बसवाल्यांच्या मनमानी कारभाराला वेळीच लगाम घातला नाही तर याहीपेक्षा मोठा अपघात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

No comments: